Home शासकीय आधुनिक पीक पद्धतीचा अंगीकार करून बळीराजाचे उत्पादन वाढविण्याचे कार्य कौतुकास्पद – सी. पी. राधाकृष्णन

आधुनिक पीक पद्धतीचा अंगीकार करून बळीराजाचे उत्पादन वाढविण्याचे कार्य कौतुकास्पद – सी. पी. राधाकृष्णन

52 second read
0
0
14

no images were found

आधुनिक पीक पद्धतीचा अंगीकार करून बळीराजाचे उत्पादन वाढविण्याचे कार्य कौतुकास्पद  सी. पी. राधाकृष्णन

 

 मुंबई : महाराष्ट्र हे देशात प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घेवून आपला ठसा उमटविणारे राज्य आहे. कृषी क्षेत्रातही राज्याची भरारी वाखणण्याजोगी आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात असताना सगळीकडे शेतकरी आधुनिक पीक पद्धतीचा अवलंब करीत असल्याचे प्रकर्षाने दिसले. उत्पादन वाढीसाठी बळीराजा करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांनी काढले. यावेळी त्यांनी पुरस्कार विजेत्या शेतकरी बांधवांचे अभिनंदन केले.

कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या  सन 2020, 2021 व 2022 या तीन वर्षाचे सत्कार व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन वरळी येथील एन. एस. सी. आय डोम येथे करण्यात आले. त्यावेळी राज्यपाल श्री. राधाकृष्णन उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमास व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, आमदार विक्रम काळे, कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे, फलोत्पादन विभागाचे संचालक कैलास मोते उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्ण म्हणाले, राज्याची एक रुपयात पीक विमा योजना ही देशात एकमेव आहे. या योजनेचा अन्य राज्य अंगीकार करत आहे. राज्यात कृषी क्षेत्रात अनुदान योग्य मार्गाने दिले जात आहे. शेततळ्याकरीता अनुदान देण्यात येत असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेततळे घेवून शेतीला संरक्षित सिंचन उपलब्ध करत आहे. ठिबक सिंचन अनुदान ही राज्याची एक मोठी योजना आहे,  यामुळे प्रत्येक थेंबाचा उपयोग उत्पादन वाढीसाठी होत आहे.

महाराष्ट्र राज्य कापूस, सोयाबीन, केळी व द्राक्ष उत्पादनात देशात अव्वल आहे. राज्यातील बळीराजाची मेहनत व आधुनिक तंत्रज्ञानाचा होत असलेला अंगीकार यामुळे महाराष्ट्र हे देशात कृषी क्षेत्रातील अग्रगण्य राज्य बनले आहे, असेही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले. पुरस्कार वितरणावेळी शेतकरी माझ्यासोबत छायाचित्र काढत नाही,  तर मीच शेतकऱ्यांसोबत छायाचित्र काढणार आहे, असे बोलून राज्यपाल श्री.  राधाकृष्णन यांनी बळीराजाच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाला राज्यभरातून आलेले शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संचालक (कृषी व विस्तार) विनयकुमार आवटे यांनी मानले.

कापूस- सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हजार 500 कोटी अर्थसाहाय्याचे वितरण – उपमुख्यमंत्री अजित पवार

आपल्या काळ्या आईची सेवा करून मोठ्या कष्ट,  मेहनतीने अन्नधान्याचे उत्पादन बळीराजा घेत असतो. कुठल्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये शासन बळीराजाच्या पाठीशी आहे. २०२३ मध्ये सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या दरामध्ये झालेल्या नुकसानीपोटी प्रती हेक्टरी पाच हजार दोन हेक्टर मर्यादेत देण्यात येणार आहे. राज्यातील आधार संलग्न बँक खात्यांची पडताळणी झालेल्या 65 लाख शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाले आहे. या अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी प्रणालीद्वारे थेट बँक खात्यात उद्यापासून करण्यात येणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केली. तसेच ऊर्वरित शेतकऱ्यांच्या खात्याचे आधार संलग्नता व कागदपत्रांची पडताळणी करून अर्थसाहाय्याचे वितरण करण्यात येईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले,  शेतकऱ्यांच्या साडेसात अश्‍वशक्तीपर्यंत कृषी वीजपंपाचे देयक माफ करण्यात आले आहे. यापुढे साडेसात एचपीपर्यंत वीज पंप असणाऱ्या शेतकऱ्यांना देयक येणार नाही. दिवसा वीज देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे.  त्यानुसार 9 हजार 500 मेगावॅट वीज सौर उर्जेवर निर्माण करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. पुढील सहा महिन्यात शेतकऱ्यांना दिवसा पूर्णपणे वीज मिळणार आहे.  शेतकऱ्यांना 24 हजार कोटी रुपये खर्चून साडेआठ लाख सौर कृषी पंपाचे वितरण हे करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी जिथे केंद्र शासनाची मदतीची आवश्यकता असते, तिथे केंद्रशासन राज्याला मदत करीत आहे. कांदा व  बिगर बासमती तांदुळावरील  निर्यात बंदी उठविण्यात आली आहे. सोयाबीन खाद्यतेलावर आयात शुल्क वाढविल्यामुळे सोयाबीनच्या किमती वाढणार आहे. याचा लाभ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. ऊसाला किमान आधारभूत किंमत  वाढवीण्यासाठी केंद्र शासनाची चर्चा झाली आहे. शासन गायीच्या दुधाला सात रुपये प्रति लिटर अनुदान, अटल बांबू समृद्धी योजना, नळगंगा –  वैरागंगा नदी जोड प्रकल्प, पश्चिमेकडून समुद्रात वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविणे अशा महत्त्वाच्या योजनांवर शासन काम करीत आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले. बळीराजाला त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराची रक्कम चौपट करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

शेती क्षेत्रात संशोधन करून शेतकऱ्यांनी समाजात सुबत्ता आणली – कृषी मंत्री धनंजय मुंडे

हजारो वर्षांपूर्वी शेतीची जेव्हा सुरुवात झाली, तेव्हापासून शेतकरी या व्यवसायात आहे. शेती क्षेत्रात संशोधन करून शेतकऱ्यांनी समाजात सुबत्ता आणली आहे,  असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज सत्कार व पुरस्कार वितरण समारंभात केले.

कृषी मंत्री श्री. मुंडे म्हणाले, कृषी विभागाने मिशन मोडवर पुरस्कारांची छाननी पूर्ण करून मागील तीन वर्षांचे पुरस्कार देण्यात येत आहे. बळीराजाला मुंबईत सन्मानपूर्वक आमंत्रित करून त्याच्या कार्याचा यथोचित गौरवाने काळ्या आईची सेवा करणाऱ्या बळीराजाचे ऋण फेडण्याची ही संधी आहे.

परंपरागत शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात येत आहे.  शेतीमध्ये ड्रोनचा वापर करण्यात येत आहे.  शेतीमालाच्या दरासाठी ऍग्रोथॉन ॲप  विकसित करण्यात आले आहे.  सोयाबीन संशोधनासाठी शासन प्रयत्न करीत आहेत. डॉ.  पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन, सोयाबीन उत्पादन वाढ व मूल्य साखळीचा विकास, एक रुपयात पिक विमा, कृषी यांत्रिकीकरण, गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात अनुग्रह अनुदान योजना, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प आदींची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

परळी (जि. बीड) येथे सोयाबीन संशोधन संस्था, नागपूर येथे आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र, चांदूरबाजार (जि. अमरावती) येथे सिट्रेस इस्टेट,  दिवे आगार येथे सुपारी संशोधन केंद्र, बुलढाण्यात शासकीय कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. सन 2023 – 24 मध्ये राज्यात 142. 64 लाख मेट्रिक टन अन्नधान्य उत्पादन घेण्यात आले आहे. यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 3. 39 टक्क्याने वाढ नोंदविण्यात आली आहे.  हे सर्व माझ्या बळीराजाचे यश आहे, अशा शब्दात कृषी मंत्री श्री मुंडे यांनी बळीराजाचे कौतुक केले.

राज्याच्या कृषी क्षेत्राच्या भरीव कामगिरीची  दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील घेण्यात आली आहे.  वर्ल्ड अग्रिकल्चर फोरमने राज्यला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मानित केले आहे, असेही कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले.

विविध कृषी पुरस्कारांचे वितरण

सन 2020, 2021 व 2022 करिता विविध कृषी पुरस्कारांचे वितरण राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन,  उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याहस्ते आज  विविध 448 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यामध्ये 5 शेतकरी बांधवांना डॉ.  पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, 27 शेतकऱ्यांना वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, 26 शेतकऱ्यांना जिजामाता कृषी भूषण पुरस्कार, 25 शेतकऱ्यांना वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार, 21 शेतकऱ्यांना कृषी भूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, 25 शेतकऱ्यांना युवा शेतकरी पुरस्कार, 25 शेतकऱ्यांना उद्यान पंडित पुरस्कार, 96 शेतकऱ्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट), 17 शेतकऱ्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी गट) शेतकऱ्यांना देण्यात आले. तर  27 अधिकारी व कर्मचारी यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार  देण्यात आले.  तसेच  राज्यस्तरीय पीक स्पर्धेतील विजेत्या 154 शेतकऱ्यांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले. अशा प्रकारे  448 शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात आले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…