no images were found
अमेरिकेतील उच्चशिक्षण संधींचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा: अमेरिकेचे कॉन्सुल जनरल माईक हँकी यांचे आवाहन
कोल्हापूर : अमेरिकेमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना आधुनिक उच्चशिक्षणाच्या मुबलक संधी उपलब्ध असून त्यांचा लाभ घेण्यासाठी कोल्हापूर परिसरातील विद्यार्थ्यांनी पुढे यावे, असे आवाहन अमेरिकेचे मुंबईतील कॉन्सुल जनरल माईक हँकी यांनी आज येथे केले.
कोल्हापूरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या हँकी यांनी आज राजर्षी शाहू सभागृहात शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे उपस्थित होते.
कॉन्सुल जनरल माईक हँकी म्हणाले, अमेरिकी विद्यापीठे व शिक्षण संस्थांमध्ये अभियांत्रिकी आणि संगणकशास्त्र या शाखांपलिकडे मानव्यशास्त्रे, विज्ञान आणि व्यवस्थापन इत्यादी विद्याशाखांतीलही आधुनिक उच्चशिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. त्यांचा लाभ भारतीय विद्यार्थ्यांनी घ्यायला हवा. अमेरिकेचे भारताशी घट्ट राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक बंध आहेत. अमेरिकेत उच्चशिक्षण घेण्यास पसंती दर्शविलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या चीनपाठोपाठ सर्वाधिक आहे. अमेरिकेकडे शैक्षणिक व्हिसा मागणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढती आहे. अमेरिकी विद्यापीठांसाठी भारतीय विद्यार्थी हे मोठी देणगीच आहेत. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा उभय देशांनाही भविष्यात मोठा लाभ झाल्याखेरीज राहात नाही. शिवाजी विद्यापीठासह कोल्हापूर विभागातील विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील शिक्षण संधींचा लाभ घेण्याबाबत विचार करावा. त्यांना विद्यापीठ निवडीपासून ते प्रवेश प्रक्रिया, व्हिसा प्रक्रिया आदींसाठी कॉन्सुलेट सर्वोतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
तत्पूर्वी, व्यवस्थापन परिषद सभागृहात कुलगुरू डॉ. शिर्के यांनी शाल, श्रीफळ व विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह देऊन कॉन्सुल जनरल हँकी यांचा सत्कार केला. प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी स्वागत केले, तर इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजिस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांनी शिवाजी विद्यापीठाच्या वाटचालीबद्दल अवगत केले. त्याबद्दल समाधान व्यक्त करून शिवाजी विद्यापीठासमवेत नजीकच्या काळात साहचर्यवृद्धीबद्दलही सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कॉन्सुलेटचे राजकीय व आर्थिक अधिकारी रॅन मुलेन, विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, बौद्धिक संपदा हक्क कक्ष आणि आंतरराष्ट्रीय संबंध कक्ष यांचे समन्वयक डॉ. शिवाजी सादळे, इंग्रजी अधिविभागाच्या डॉ. तृप्ती करेकट्टी यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक उपस्थित होते.