no images were found
पर्यटनातून जिल्ह्याच्या विकास होण्यासाठी वाढीव निधीची तरतूद करणार –पालकमंत्री केसरकर
कोल्हापूर : पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेत वाढीव निधीची तरतूद करण्यात येईल, असे सांगून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दिपक केसरकर यांनी केले. यावेळी सन 2023-24 च्या आराखड्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेने तात्काळ सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.
पालकमंत्री दिपक केसरकर म्हणाले, मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करुन वाचन चळवळ रुजण्यासाठी ‘पुस्तकांचे गाव’ यासारखे उपक्रम हाती घ्यावे. यासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून तरतूद करण्यात येईल. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शाळांची पाहणी करुन शाळा दुरुस्तीला प्राधान्य द्यावे. वारंवार पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागणाऱ्या शाळांच्या स्थलांतराबाबत पर्यायी व्यवस्था करावी. जिल्ह्यातील तालमी, जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती, शासकीय इमारती, आरोग्य केंद्रे, क्रीडांगणे दुरुस्ती व सोयी सुविधांचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत. पोलीस वसाहतींची पाहणी करुन पोलीसांना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. याठिकाणी विद्युत व्यवस्था, स्वच्छतागृहे, इमारत दुरुस्ती आदी कामे करुन घ्यावीत.
कोल्हापूर जिल्ह्यात विकासासाठी पोषक वातावरण असल्याने जिल्ह्याच्या विकासासाठीचे प्रस्ताव विविध समित्यांनी तयार करुन जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावेत. यासाठी आवश्यक निधीची तरतूद जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी नियोजनबध्द प्रयत्न करावेत. शेतीसह ग्रामविकासावर भर द्यावा.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर निधी, प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली कामे, यासाठी देण्यात आलेला निधी, आवश्यक निधी आदींबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी माहिती दिली.
जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत झालेल्या कामाची व सद्यस्थितीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.