no images were found
श्रीमद् रामायणात सीतेच्या प्रवासाबद्दल प्राची बंसल म्हणतात… ही त्याग, शक्ती आणि भावनिक आर्ततेची कथा..
सोनी सबवरील श्रीमद् रामायणात सध्या उत्सवाची तयारी सुरु आहे. महायुद्धात रावण (निकितिन धीर) याचा पराभव केल्यानंतर श्रीराम (सुजय रेऊ) आणि सीता (प्राची बंसल) अयोध्येला परतले आहेत. श्रीराम आणि सीतेच्या जीवनात इथपासून नव्या अध्यायाला सुरुवात होते. रामराज्य स्थापन करण्यापासून दिव्य विरह आणि त्यांची मुले लव आणि कुश यांच्या जन्मापर्यंत श्रीमद् रामायणाचा नवा अध्याय दर्शकांना अनेक न ऐकलेल्या कथा ज्ञात करेल.
मालिकेत सीतेचे पात्र साकारणारी प्राची बंसल हिने अनौपचारिक चर्चेदरम्यान, रामायणाच्या नव्या अध्यायात सीतेचे पात्र साकारण्यासंबंधीचे सुखद अनुभव आणि इतर काही मुद्द्यांवर चर्चा केली आहे.
सोनी सबवरील कथेतील या नव्या पर्वात सीतेच्या पात्राविषयी काही सांगा…
कथेच्या नव्या पर्वात सीतेच्या पात्रात भावनांचे प्रचंड चढ-उतार आहेत. रावणाच्या अशोक वाटिकेत बंदी होणे आणि वनवासाचा कठीण काळ गेल्यानंतर सीतेसाठी अखेर आनंदाचे नवे पर्व सुरु होणे… हे सगळं खूप रोमांचक आहे. श्रीरामांशी तिचे पुन्हा एकदा मिलन झाले आहे. प्रेक्षकांना या मिलनाची खूप प्रतीक्षा होती. पण खरं तर सीतेचा हा प्रवास संपलेला नसतो. या जोडप्यावर दिव्य विरहाचे ढग आहेत. त्यानंतर प्रेक्षकांना या दोघांच्या जीवनातील आणखी एक आव्हानात्मक काळ पहायला मिळेल.
रामायणाची ही प्राचीन कथा जिवंत करताना तरुण प्रेक्षकांसाठी सर्वात चांगला भाग कोणता आहे?
युवा प्रेक्षकांसाठी रामायण सादर करण्यामागील सर्वात चांगला हेतू म्हणजे, यामुळे आजची पिढी आपल्या संस्कृतीशी पुन्हा जोडली जाईल. लोक जसे जसे आधुनिक होत आहेत, तसे ते आपल्या परंपरांपासून दूर जात आहेत. या कथा आपल्याला जीवनातील मूल्ये शिकवतात.. देवतांनाही कशा प्रकारे आव्हानांचा सामना करावा लागला होता.. हे शिकवतात, त्यामुळे त्या महत्त्वाच्या आहेत. आव्हाने हा जीवनाचा भाग असतात, मात्र ती पार करणे शक्य असते, हे या कथांच्या माध्यमातून आपल्याला कळते. या गोष्टी मालिकेच्या माध्यमातून सर्वांना सांगणे मला जास्त महत्त्वाचे वाटते.
सीतेच्या चरित्रातील कोणता पैलू आवडला? सीतेकडून तुम्ही कोणती शिकवण घेतली?
सीतेचा शांत आणि संयमी स्वभाव हा माझ्याशी मिळता-जुळता आहे. तिचे पात्र साकारताना मला खूप काही शिकायला मिळाले. मला आतापर्यंत वाटत होते की, माझ्या आयुष्यात खूप समस्या आहेत. पण सीतेसमोरील आव्हानांपुढे माझ्या समस्या काहीच नाहीत. आता मी प्रत्येक आव्हान आणि आनंदाचे प्रसंग यांच्या मागे दडलेला सखोल अर्थ समजून घ्यायला शिकले आहे. आयुष्यातील विविध टप्पे आणखीच स्पष्टपणे पाहण्यासाठी मला खूप मदत होत आहे.
सीतेच्या त्यागाची कथा आजच्या महिलांच्या जीवनाशी कशी जोडता येईल?
सीतेचा त्याग हा रामायणातील महत्त्वाचा टप्पा आहे. अनेक शतकांपासून या प्रसंगांनी महिलांना प्रेरणा मिळाली आहे. त्यांचा प्रभाव आहे. सीतेचा त्याग ही केवळ एक पौराणिक कथा नाही. तर समाज आणि नात्यांच्या नव्या पैलूंवर याद्वारे प्रकाश टाकता येतो. सीतेने कुटुंब आणि प्रेमासाठी खूप त्याग केला. आजही महिला आपल्या कुटुंबासाठी अनेक प्रकारचे बलिदान देत असते. त्यांना करिअर, स्वत:ची स्वप्न इतकंच काय तर स्वत:ची ओळखदेखील समर्पित करावी लागते.
कथेच्या या टप्प्यात तुम्ही तुमचे पात्र कसे साकारत आहात?
सीतेच्या या टप्प्यातील पात्र साकारण्यासाठी मी तिच्या चरित्रातील अनेक गुंतागुंत आणि पुढे घडणाऱ्या कथांचा अगदी सविस्तर अभ्यास केला. या पात्रातील भावनिक आर्ततेचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. कारण ती प्रचंड मोठ्या संकटांतून जात आहे. या कथेमागील सूक्ष्मता आणि सीतेच्या कार्यातून प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी साकारण्यासाठी रचनात्मक टीमसोबत सविस्तर चर्चा केली. माझे सीतेचे पात्र साकारण्यात सहयोगी प्रक्रियेचे मोठे योगदान आहे. त्याशिवाय मी त्या काळातील पात्र अगदी हुबेहुब साकारण्यासाठी मी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भात स्वत:ला झोकून दिले. सीतेच्या कथानकात एक नवा दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी मी उत्सुक आहे. तसेच सीतेच्या चरित्रातील मूल स्वरुपाचाही मी सन्मान करते.