no images were found
त्र्यंबोली यात्रेचा उद्या सोहळा
भगवान श्री सूर्यनारायणांनी श्री देवीस त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ दिला त्या प्रसंगाची आठवण म्हणून रथअलंकार महापुजा बांधण्यात येते . या पूजेचे वैशिष्ट्य म्हणजे श्री तुळजाभवानी माता सप्तअश्व असलेल्या रथात आरूढ होऊन भ्रमणास जाते. यावेळी तुळजाभवानी देवीच्या एका हातात चाबूक तर दुस-या हातात घोड्यांचा लगाम आहे.
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची सिद्धीदात्री रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. दरम्यान, नवरात्रोत्सवातील महत्त्वाचा त्र्यंबोली यात्रेचा सोहळा यंदा शुक्रवारी (ता.३०)पारंपरिक उत्साहात साजरा होणार आहे. दोन वर्षांनी पारंपरिक लवाजम्यासह हा सोहळा होणार असून, टेंबलाई टेकडीवर यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात आज अंबारीतील सालंकृत पूजा बांधण्यात आली.
मोफत बस सेवा- शारदीय नवरात्रोत्सवात पंचमीचा दिवस महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी टेंबलाई येथे मोठी यात्रा भरते. लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. भाविकांना दर्शनासाठी जाणे सुलभ होण्यासाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट यांच्या वतीने गेली आठ वर्षे मोफत बससेवा देण्यात येते. यावर्षीही भाविकांसाठी पंचमी दिवशी शुक्रवारी मोफत बससेवा ठेवली आहे. बिंदू चौक ते टेंबलाई आणि परत बिंदू चौक अशी ही सेवा सुरू राहणार आहे. त्यासाठी चार गाड्या सुसज्ज ठेवण्यात आल्या असून त्या बिंदू चौक येथून निघणार आहेत. या मोफत बससेवेची वेळ सकाळी ६ ते रात्री ११ अशी ठेवण्यात आली असून, सर्व भाविकांनी या मोफत बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी केले आहे.