no images were found
कारखान्याला नाव लावायला मी सतेज पाटील नाही : अमल महाडिक
नागाव : ‘कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम कारखान्यात ३० वर्षे आम्ही सत्तेत आहोत; पण कारखान्याचा सातबारा आणि नावही जपले, या जागेवर आमचे नाव लावायला आम्ही सतेज पाटील नाही,’ असे प्रत्युत्तर ‘राजाराम’चे संचालक आमदार अमल महाडिक यांनी आज पत्रकाद्वारे दिले.
श्री. पाटील यांनी कारखान्याच्या वार्षिक सभेच्या पार्श्वचभूमीवर झालेल्या बैठकीत श्री. महाडिक यांच्यावर टीका केली होती, त्याला आज श्री. महाडिक यांनी प्रत्युत्तर दिले. सप्तगंगा साखर कारखाना सतेज पाटील यांच्या ताब्यात येताच पाच-दहा वर्षांत त्याचे नाव बदलले. ‘अजिंक्यतारा’ या त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा सातबारा आधी कोणाच्या नावावर होता आणि आता कोणाच्या नावावर आहे, त्यांनी जाहीर करावे, असे आवाहनही श्री. महाडिक यांनी केले आहे.
कुठल्या तरी कोपऱ्यात लपूनछपून सभा घेणे ही आमची पद्धत नाही. महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वावर विश्वास असणारे आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व सभासद सभेला उपस्थित राहतील व कारखाना योग्य हातातच आहे, यावर शिक्कामोर्तब करतील. रात्रंदिवस फक्त सात-बारा आणि जमीन एवढेच विचार या व्यक्तीच्या डोक्यात असतात का, असेही पत्रकात म्हटले आहे.
डी. वाय. पाटील साखर कारखान्याची वार्षिक सभा कधी होते? अहवाल छापला जातो का नाही? हेही तिथल्या सभासदांना माहिती नाही. त्यामुळे पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्रीप्रमाणे वार्षिक सभा आणि निवडणूक आली, की राजाराम कारखान्याबद्दल बोलण्याची सवय त्यांनी थांबवावी. ज्यांनी स्वतः सहकाराचा गळा घोटण्याचे पाप केले, दोन-दोन पिढ्यांनी मिळून शासकीय जमिनी लाटल्या, देवस्थानच्या जमिनी लाटल्या, विद्यापीठं लुटली, त्यांनी तीन दशके सहकार टिकविणाऱ्यांना शहाणपण शिकविण्याच्या भानगडीत पडूच नये, असेही पत्रकात म्हटले आहे.
‘सभेनंतर बावड्यातून बाहेर जाणे महाग होईल’ अशी धमकी त्यांनी दिली आहे. आताच जर या लोकांची ही भाषा असेल, तर यांच्या नजरेत इतर १२१ गावांच्या सभासदांची काय किंमत आहे? सतेज पाटलांनी गुंडासारखी धमकीची भाषा वापरू नये, महाडिकांसाठी बावडा परका नाही, बावडा जहाँगिरी असल्यासारखी वक्तव्ये करून बावड्याची बदनामी करू नये, एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही पत्रकात दिला आहे.