no images were found
शिवस्पंदन मध्ये संगीत व नाटयशास्त्र अधिविभाग सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेता
कोल्हापूर (प्रतिनिधी) – शिवाजी विद्यापीठ परिसरातील विविध अधिविभागांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांच्या कला, गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहामध्ये विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने सुरू असलेल्या तीन दिवसीय शिवस्पंदन महोत्सवाच्या सांगता समारंभाचे (दि.23) आयोजन करण्यात आले होते. शिवस्पंदन 2023-2024 या विद्यापीठस्तरीय कला, सांस्कृतिक स्पर्धेमध्ये संगीत व नाटयशास्त्र अधिविभागाने सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदाचा फिरता चषक पटकावला. या स्पर्धेमध्ये समुह नृत्य, एकल नृत्य, लघुनाटीका, सुगम गायन, लोकवाद्य वादन (एकल), समूहगीत, मुकनाटय, नकला या आठ कला प्रकारांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी बोलताना म्हणाले, विद्यापीठ परिसरातील विद्यार्थ्यांच्या कला, गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी मागील वर्षापासून सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. या शिवस्पंदन स्पर्धेमध्ये विद्यापीठातील 40 अधिविभागातील विद्यार्थी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सहभागी झालेले आहेत. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्रशासन, आणि संयोजकांनी परिश्रम घेतलेले आहेत. कुलसचिव डॉ.विलास शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.प्रकाश गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.नितीन कांबळे यांनी तीन दिवसांच्या कार्यक्रमाचा आढावा सादरम केला. समन्वयक, डॉ.श्रीमती एम.बी.पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
तत्पूर्वी, लोकवाद्य महोत्सवामध्ये देशभरातील 75 लोकवाद्यांच्या वादनाने मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण आपल्या खास शैलीत सादर करण्यासाठी ऋषीकेश देशमाने आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विषेश परिश्रम घेतले. तद्नंतर, विद्यार्थ्यांनी एकल नृत्य आणि समूह नृत्याचे उत्साहात सादरीकरण केले. या कार्यक्रमामध्ये जवळपास 450 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी राजमाता जिजाऊसाहेब सभागृहामध्ये विद्यार्थी, पालक आणि प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. डॉ.शरद बनसोडे, डॉ.रामचंद्र पवार, डॉ.तानाजी चौगुले, डॉ.के.एम.गरडकर, डॉ.नंदकुमार मोरे, डॉ.श्रीमती ए.एस.जाधव, डॉ.पी.एम.माने, डॉ.पी.डी.पाटील, डॉ.के.व्ही.मारूळकर, डॉ.व्ही.एस.खंडागळे, डॉ.श्रीमती प्रतिभा देसाई, डॉ.प्रमोद कसबे, डॉ.एस.टी.कोंबडे उपस्थित होते.