no images were found
स्वायत्त निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती नाही : सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या कामकाजात मध्यस्थी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. यामुळे पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे शिंदे गटाला दिलासा मिळाला असून, ठाकरेंना मात्र मोठा धक्का आहे.
खरी शिवसेना आपणच असल्याचा शिंदे गटाचा दावा असून, निवडणूक आयोगाला यासंबंधी निर्णय घेण्यापासून रोखलं जावं अशी मागणी ठाकरेंच्या वतीने करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची ही याचिका फेटाळून लावली. आज दिवसभर पार पडलेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कामकाजावर स्थगिती आणण्यास नकार दिला. यामुळे पक्षचिन्हासंबंधी निर्णय घेण्याचा निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘धनुष्यबाण’ मिळवण्यासाठी शिंदे गट आणि ठाकरेंमध्ये सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली लढाई आता निवडणूक आयोगासमोर पोहोचली आहे.
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी पार पडली. आजपासून घटनापीठासमोर सुनावणीचं युट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आल्याने हा दिवस ऐतिहासिक ठरला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “लोकशाहीत बहुमताला महत्त्व असतं. आज बहुमत आमच्याकडे आहे. विधानसभेतही आणि लोकसभेतही. जे काही निर्णय होतात ते घटनेनुसार होतात. कायदेकानून असतात. सर्वोच्च न्यायालयाने सर्व बाबींचा विचार करून निर्णय दिला आहे.
निवडणूक विभाग स्वायत्त यंत्रणा आहे. काही निर्णय न्यायालयात होतात, काही निवडणूक आयोगासमोर होतात. लोकशाहीला साजेसा निर्णय. घटनातज्ज्ञांना असंच वाटत होतं”.