no images were found
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची दलालकडून लाखोंची फसवणूक
तासगाव- तालुक्यातील मणेराजुरी व परिसरातील १६ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची झारखंड येथील दोन व्यापाऱ्यांनी ३६ लाखांची फसवणूक केल्याची घटना आज उघडकीस आली. दरम्यान, हा दलाल पळून गेल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरू असलेल्या द्राक्ष हंगामातील फसवणुकीचा ही पहिली घटना आहे. दरम्यान, पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.
मणेराजुरी परिसरात द्राक्ष हंगाम सुरू झाला असून देशभरातून व्यापारी तालुक्यात आलेले आहेत. झारखंड येथील पप्पू व रिझवान मलिक हे दोघे काही दिवसांपासून मणेराजुरी परिसरातून तासगाव येथील एका मध्यस्थाच्या माध्यमातून द्राक्ष खरेदी करत आहेत. हे दोघे आरवडे येथे खोली घेऊन भाड्याने राहत होते.मात्र ते आज सकाळी त्यांच्याकडे गेलेल्या शेतकऱ्यांना दोघे गायब झाल्याचे लक्षात आल्याने एकच खळबळ उडाली. ज्यांनी या व्यापाऱ्यांना द्राक्ष दिलेली होती, त्यांनी शोधाशोध सुरू केली, फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.मात्र फोनही बंद येत असल्याने शेतकरी त्या मध्यस्थाला घेऊन तासगाव पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात शेतकरी होते. या शेतकऱ्यांकडे स्थानिक मध्यस्थाचे नाव व व्यापाऱ्याचा फोन नंबर याशिवाय काहीही नाही.
काही दिवस या व्यापाऱ्यांनी रोखीने द्राक्ष खरेदी करून विश्वास संपादन केला. सुरवातीचे पैसे रोख दिले. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून खरेदी केलेल्या द्राक्षांचे पैसे आज उद्या देतो, असे म्हणत या व्यापाऱ्यांनी पोबारा केला.मणेराजुरी येथील १६ द्राक्ष शेतकऱ्यांची ३६ लाख २१ हजार २९२ रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये १२ हजारांपासून ४ लाखांपर्यंत फसवणूक झालेले शेतकरी आहेत.गेल्या वर्षी मणेराजुरीतील शेतकऱ्यांना दोन कोटी रुपयांचा गंडा द्राक्ष व्यापाऱ्यांनी घातला होता.