no images were found
कणेरी मठाला लोक प्रबोधनाची परंपरा
कोल्हापूर :सातव्या शतकात परमपूज्य आद्य काडसिद्धेश्वर स्वामी श्री निर्वायाव यांनी काडसिध्देश्वर श्री क्षेत्र सिद्धगिरी, कणेरी येथे येऊन भक्तांना अ़ध्यात्मिक आणि दैनंदिन जीवन सुखकारक होण्यासाठी मार्गदर्शन करण्यास सुरूवात केली. तर १९२२ मध्ये मुप्पीन काडसिध्देश्वर स्वामीजींनी ४८ वे मठाधिपती म्हणून दायित्व स्वीकारले. त्यानंतर मठात अनेक बदल झाले. मठाच्या आध्यात्मिक परंपरेचे संवर्धन करत मठाचा सामाजिक कार्याच्या क्षेत्रात मुप्पीन काडसिध्देश्वर स्वामीजींनी समावेश केला. स्वामीजींनी सर्व जाती धर्मासाठी मठाचे दरवाजे खुले केले. आर्थिक दुर्बल घटकातील मुलांसाठी शाळा व वृद्धाश्रमाची निर्मिती केली. ४९ वे मठाधिपती म्हणून अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी १९८६ ला मठात आले.अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींनी मुप्पीन स्वामीजींनी सुरू केलेल्या परंपरेला पुढे नेत आधुनिकतेची व कल्पकतेची जोड दिली आणि भव्य स्वरूपात लोकांचे कल्याणकारी कार्य सुरू केले. जंगलाला कन्नड भाषेत काड म्हंटले जाते व सिध्देश्वरचा अर्थ महान पुरूष. इ. स. सातव्या शतकात कणेरी मठ या ठिकाणी असलेल्या जंगलात अनेक सिध्द पुरूष/महान संत येऊन ध्यान धारणा करायचे म्हणून येथील स्वामीजींना काड सिद्धेश्वर स्वामी म्हणतात. अदृश्य काड सिद्धेश्वर स्वामीजींनी पंचतत्वांचे महत्त्व ओळखून ही तत्व संवर्धित करण्यासाठी मठामध्ये खास प्रयत्न, विविध प्रयोग सुरू केले. यशस्वी झालेले प्रयोग लोकांच्यासाठी खुले केले.
स्वामीजींनी मठात देशी गोवंशाची गोशाळा, दवाखाना, शाळा, महाविद्यालय, सेंद्रिय शेती, लखपती शेती प्रकल्प, महिला सक्षमीकरणासाठी लघुउद्योग, ६४ कला आणि १४ विद्यांचे मोफत शिक्षण देणारे गुरुकुलम, गो-आधारित औषध निर्मिती केंद्र, अनाथ आणि दुर्बल घटकांच्या मुलांसाठी आनंदाश्रम असे अनेक लोकोपयोगी प्रयोग साकारले आहेत. स्वामीजींनी आशिया खंडातील नामांकित असे म्युझियम निर्माण केले आहे. प्राचीन भारतीय स्वयंपूर्ण ग्रामजीवन, भारतीय कृषी परंपरा आणि भारतीय उत्सवांचे एकत्रित दर्शन या म्युझियममध्ये पाहायला मिळते.