no images were found
योग साधना आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग असावी – अमगोथू श्रीरंगा नायक
मुंबई : सध्याचे जीवन धकाधकीचे आहे. प्रत्येक जण आपल्या महत्त्वाकांक्षेपोटी व उद्दिष्ट कृतीसाठी परिश्रम घेत आहे. यामध्ये मात्र शरीर स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होते. त्यासाठी प्रत्येकाने योग साधनेला आपल्या दैनंदिन जीवन शैलीचा भाग बनवावे, असे प्रतिपादन आरोग्य सेवा आयुक्त अमगोतू श्रीरंगा नायक यांनी केले.
आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्यसेवा आयुक्तालय कार्यालयात आयोजित जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात आयुक्त श्री.नायक बोलत होते.
योग ही भारतीयांनी जगाला निरोगी राहण्यासाठी दिलेली साधना असल्याचे सांगत आयुक्त श्री.नायक म्हणाले की, या वर्षीच्या दहाव्या जागतिक योग दिवसाचा संदेश ‘स्वत: व समाजाकरिता योग’ (Yoga for self and society) असा आहे. दररोज नियमित योग साधना करून सर्वांनी निरोगी रहावे.
शरीर व मनाला जोडणारा दुवा म्हणजे योग आहे. योग साधनेमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते, असे सहसंचालक डॉ. विजय बाविस्कर यांनी सांगितले. यावेळी इशा फाऊंडेशनच्या योग प्रशिक्षक मोहिनी बासल, संदेश दादरकर व सहकाऱ्यांनी प्रात्यक्षिक सादर करून योगाबाबत माहिती दिली. स्वागत व प्रास्ताविक डॉ. सुभाष घोलप यांनी केले. आयुष विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. रामचंद्र हंकारे यांनी आभार मानले. कार्यक्रमास संचालक (वित्त) जयगोपाल मेनन, सहसंचालक सुभाष बोरकर, डॉ. स्वप्नील लाळे, तसेच आरोग्य सेवा आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.