no images were found
अंबाबाई मंदिर प्रशासनाच्या ई-पेड पासला स्थगिती
कोल्हापूर : नवरात्रोत्सवात कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या दर्शनासाठी देवस्थान समितीने अंबाबाई मंदिरात २०० रुपये आकारून वेगळी व्हीआयपी पेड दर्शन रांग करण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात कोर्टामध्ये याचिकाही दाखल करण्यात आली होती. ई-पेड पासला कोर्टाने स्थगिती दिली आहे.
यंदाच्या नवरात्रोत्सवात देवस्थान समितीने अंबाबाई मंदिरात २०० रुपये आकारून वेगळी व्हीआयपी पेड दर्शन रांग करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमांचं उल्लंघन करुन हा ई पेड पास सुरू करण्यात आला होता. श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी त्याविरोधात दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यामुळे कोर्टाने ही स्थगिती दिली आहे. या पासला सोमवारपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. कोल्हापूर अंबाबाई मंदिर प्रशासनाला हा धक्का असून सोमवारी संध्याकाळपर्यंत पेड पासेस द्यायचे नाहीत, त्यांचा वापर करायचा नाही, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.
अंबाबाई मंदिरामध्ये महाराष्ट्र सरकारने देवीच्या दर्शनासाठी कोणत्याही देवस्थानने भाविकांसाठी नियमित रांगेव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने दर्शन घेण्यास परवानगी घेण्यात येऊ नये व तशी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात येऊ नये, अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना शासनाने ७ सप्टेंबर २०१० ला जाहीर केल्या होत्या. या मार्गदर्शक सूचना अमलात आणण्यासाठीचा दावा १५ ऑक्टोबर २०१० रोजी मंजूर होऊन शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने कोणालाही दर्शन देऊ नये म्हणून मनाई केली आहे. त्यामुळे बेकायदेशीरपणे स्वतंत्र रांग करता येणार नाही, असे मुनीश्वर यांनी दाखल केलेल्या दाव्यात म्हटले आहे.