no images were found
शिवतीर्थवर दसरा मेळावा होणार का? हायकोर्टात आज सुनावणी
मुंबई : शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठीच्या परवानगीचा वाद आता मुंबई हायकोर्टात पोहोचला आहे. मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाने शांतता आणि सुव्यवस्थेच्या कारणावरून शिवसेना व शिंदे या दोन्ही गटांना शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठीची परवानगी नाकारली होती. यावर आज सुनावणी होणार आहे.
शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेने परवानगी मागितली होती तसेच शिंदे गटानेही शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली होती. त्यानंतर शांततेच्या कारणावरून दोन्ही गटासाठी महापालिकेने परवानगी नाकारली होती. तर शिंदे गटाला बीकेसी मैदानावर मेळावा घेण्याची परवानगी महापालिकेने दिली होती. पण शिवतीर्थावर परवानगी न मिळाल्याने दोन्ही गट मुंबई हायकोर्टात पोहोचले असून ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये वादग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. खरी शिवसेना आमचीच आहे असा दावा दोन्ही गटांकडून करण्यात येत असून हा वादही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गटांत चुरस लागली आहे. आज यावर सुनावणी होणार असून याविषयावर पडदा पडण्याची शक्यता आहे.