
no images were found
प्रचंड शक्ती प्रदर्शनाने महायुतीचे मंडलिक, मानेंचा उमेदवारी अर्ज दाखल !
कोल्हापूर : प्रचंड शक्तीप्रदर्शन करत महायुतीचे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. गांधी मैदान ते खानविलकर पेट्रोल पंपापर्यंत प्रचंड रॅली काढली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवाय इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी उमेदवारी माघार घेत माने यांना पाठिंबा जाहीर केला. यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी आवाडे यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी चर्चा केली. चर्चेअंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मोटारीमधून आमदार आवाडे हे महायुतीचे उमेदवार माने यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सहभागी झाले.
ढोल ताशांचा गजर, आणि जय श्रीराम, जय भवानी -जय शिवाजी अशा घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली. महायुतीमधील सहभागी घटक पक्षांचे कार्यकर्ते नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, आरपीआय यांच्यासह घटक पक्ष रॅलीत सहभागी होत एकसंधपणा दर्शवला. हाती भगवे -निळे झेंडे, गळ्यात भगवी मफलर आणि पक्षाच्या विजयाच्या घोषणा देत ही रॅली मार्गस्थ झाली. “मान गादीला – मत मोदीला”या आशयाचे फलक लक्ष वेधून घेत होते. मत विकासाला- मत प्रगतीला, अबकी बार ४०० पार अशा घोषणा देत रॅलीचा मार्ग दणाणून सोडला. गांधी मैदान, महाद्वार रोड, पापाची तिकटी अशा प्रमुख मार्गावरून ही रॅली निघाली. रॅलीमध्ये कोल्हापूरसस कागल, करवीर, राधानगरी, भुदरगड, चंदगड, आजरा, गडहिंग्लज या भागातील नागरिकांचाही सहभाग होता.
पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, माजी आमदार के पी पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार अमल महाडिक, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण राजेखान जमादार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी रॅलीत होते.
दरम्यान महायुतीतील दोन्ही उमेदवारांच्या अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी कोल्हापुरात पोहोचले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे मंत्री शंभूराजे देसाई, शिवसेनेचे नेते रामदास कदम, विजय शिवतारे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांनी इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी कोल्हापुरात भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार आवाडे यांना लोकसभा निवडणुकीतून माघार घेत खासदार माने यांना पाठिंबा देण्यासंबंधी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आवाडे यांनी उमेदवारी माघार घेत माने यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे व आवाडे हे एकाच मोटारीतून महायुतीचे उमेदवार मंडलिक व माने यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आले.