
no images were found
संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात शक्ति महोत्सवाला सुरुवात
कोल्हापूर : संगीत, नृत्य व नाट्यातून संस्कार व गुणांची देवाण घेवाण होत असून पुढील पिढीला चांगल्या प्रकारचे संस्कार यातून दिले जात आहेत असे प्रतिपादन डॉ. संध्या पुरेचा, अध्यक्ष्या, संगीत, नृत्य आणि नाट्य राष्ट्रीय अकादमी, नवी दिल्ली यांनी केले. त्यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शक्ति महोत्सवाचे उद्घाटन महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात संपन्न झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, ही मंदिरांमध्ये आयोजित केली जाणारी संगीत नाट्य कला अतिशय जुनी आहे. एका चांगल्या मुहूर्तावर अंबाबाई मंदिरात चैत्र मधील नवरात्रीत हा कार्यक्रम होत असल्याचा आनंद आहे. अश्या कार्यक्रमातून आपण बरेच काही शिकूया असे आवाहनही त्यांनी उपस्थित रसिक श्रोत्यांना यावेळी केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वालनाने झाली. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेते, लोककलांचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. प्रकाश खांडगे, संगीत नाटक अकादमीचे सचिव राजू दास, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे व आदी मान्यवर उपस्थित होते.
शक्ति महोत्सव कोल्हापूर येथे होत असल्याचा अभिमान असून याचा आनंद सर्व कोल्हापूर मधील रसिकांना असल्याचे जिल्हाधिकारी, अमोल येडगे कार्यक्रमावेळी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात पद्मश्री डॉ. सोमा घोष यांच्या हिंदुस्तानी संगीतगायनाने झाली. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शक्ति महोत्सव वासंतिक नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून नवी दिल्ली येथील संगीत नाटक अकादमी आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी सात वाजता सुरू झाला.
देशभरातील सात मंदिरांमध्ये होणारा हा महोत्सव कोल्हापुरातही होत आहे. भारतातील प्राचीन मंदिरांचे पावित्र्य राखले जावे तसेच या मंदिरांच्या रुपाने अस्तित्वात असलेला मूर्त सांस्कृतिक ठेवा अधिक उजळून निघावा त्याचे पुनरुत्थान व्हावे, या उद्देशाने संगीत नाटक अकादमीने मंदिर महोत्सवांची संकल्पना अंमलात आणली आहे. त्यानुसार भारतातील सात मंदिरांमध्ये वासंतिक नवरात्रोत्सव काळात शक्ती महोत्सव घेण्यात येत आहे.
पहिल्या दिवशी डॉ. सोमा घोष यांचे हिंदुस्तानी संगीत, बीजल हरिया यांचे कुचीपुडी नृत्य, सुखदेव बंजारे यांचे पंथी नृत्य, स्वर डान्स अकादमीचे गरबा नृत्य सादर झाले. 11 एप्रिल रोजी दीपिका वरदराजन यांचे कर्नाटक संगीत, स्वप्ना नायक यांचे भरतनाट्यम, नवरंग फोक डान्स अकॅडमीचे लोकनृत्य (नवरता नृत्य), स्पंदन कला वृंद गुजरात यांचे गरबा नृत्य आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमावेळी लोककलांचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. प्रकाश खांडगे यांच्या A glimpse of folk culture of India या पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते झाले.