no images were found
पत्राचाळ बैठकीला शरद पवारांची उपस्थिती : आव्हाड
मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नाव घेतलं आहे. यासर्वावर, शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाडदेखील उपस्थित होते. त्यांनी देखील यासर्वावर भाष्य करत शरद पवारांच्या उपस्थितीत याप्रकरणी बैठक झाली असल्याचे सांगितले.
ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात पत्राचाळ प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक झाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यावरून भाजपने शरद पवारांची चौकशी करण्याची मागणी केली होती. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी होत असलेल्या आरोपांबाबत जितेंद्र आव्हाड यांनी झालेल्या बैठकीसंदर्भात भाष्य केलं आहे. शरद पवार यांनी 14 जानेवारी 2006 रोजी बैठक घेतली. या बैठकीत सर्व अधिकारी आणि संबंधित लोकं उपस्थित होते असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांनी बैठक घेतली यात नवल काय असा सवाल करत राज्यातील विविध प्रश्नी अनेक बैठका शरद पवार यांनी घेतल्या होत्या. चर्चा करुन संवाद साधणे आणि मध्य मार्ग काढणे हाच हेतू त्या बैठकीत होता.
राज्याचे माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय हे तत्कालीन गृहनिर्माण विभागाचे सचिव होते. त्यांनी या बैठकीचे इतिवृत्त असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. या बैठकीत कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत सरकार निर्णय घेईल असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले होते. संवाद साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांचा असतो. तेच या प्रकरणात झाले असल्याचे आव्हाड यांनी म्हटले.