no images were found
केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटीसाठी मुख्यमंत्री ४० आमदारांसह दिल्लीत
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४० आमदारांना सोबत घेऊन दिल्लीला जाणार असल्याचे समजते. राज्यातील रखडलेल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी ते काही केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयातही जाणार असल्याचे समजते.
राज्यात सत्ता आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कधी मंत्रिमंडळ विस्तारासाठी, तर कधी निती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीवारी केली. मात्र, आता ते त्यांच्या गटातील आमदारांनाही दिल्लीला घेऊन जाणार असल्याचे कळते. त्यासाठी महाराष्ट्र सदनातील बँक्वेट हॉल आणि प्रेस कॉन्फरन्स हॉलचा दिवस राखून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे कळते. राज्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी या दिल्ली दौऱ्यादरम्यान ते केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे समजते. यामध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि नितीन गडकरी यांचाही समावेश असल्याचे समजते.
‘वेदान्ता फॉक्सकॉनप्रकरणी उद्योगमंत्री उदय सामंतही दिल्लीला जात आहेत. मात्र, ते एकटे जाऊन काय उपयोग होणार? मुख्यमंत्री गेल्याशिवाय काही मिळणार नाही आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जेवढे दिल्ली ऐकते, तेवढे मुख्यमंत्री शिंदे यांचे ऐकेल का? त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे सोबत दिल्लीला गेले, तर हे सरकार गंभीर आहे असे मी समजतो’, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.