no images were found
सर्व जिल्ह्यांना लवकरच पालकमंत्री मिळणार
राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन तीन महिने होऊन गेले आहेत. तरीही अद्याप खातेवाटप अपूर्ण आहे. अजूनही राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्याला पालकमंत्रीदेखील मिळालेला नाही. यावरुन विरोधकांकडून सतत टीका होत असतानाच आता सर्व जिल्ह्यांना पालकमंत्री मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.
याच आठवड्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या म्हणजे ३६ जिल्ह्यांना पालकमंत्री मिळणार असल्याची माहिती साम टीव्हीच्या सूत्रांनी दिली आहे. औरंगाबादच्या पालकमंत्रीपदावरुन या नियुक्त्या खोळंबल्या होत्या. अतुल सावे की संदीपान भुमरे कोण पालकमंत्री होणार, असा प्रश्न होता. मात्र आता हे पद शिंदे गटाकडे जाणार आहे. संदीपान भुमरे औरंगाबादचे नवे पालकमंत्री असणार आहेत. त्यामुळे आता हा तिढा सुटला आहे.
कॅबिनेट मंत्र्यांना किमान दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातला विस्तार झाल्यावर राज्यमंत्र्यांनाही जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे. याच आठवड्यात पालकमंत्री घोषित होणार असून पालकमंत्र्यांअभावी जिल्ह्यातील खोळंबलेली कामे मार्गी लागतील. विरोधकांकडूनही या मुद्द्यावरुन टीका केली जात होती. मात्र आता हा प्रश्न सुटल्याचे स्पष्ट झालं आहे.