no images were found
महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी ‘रोडमॅप-2035’ तयार– देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, उद्योगस्नेही वातावरण व धोरणांमुळे गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे. राज्यात आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना करण्यात आली असून या परिषदेने महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्यासाठी ‘महाराष्ट्र 2035’ हा रोड मॅप तयार केला आहे. याद्वारे महाराष्ट्र हे देशात अग्रस्थानी राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
इंडिया ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने आयोजित नेक्स्ट टेन – वार्षिक गुंतवणूक परिषदेच्या (अन्युअल इन्व्हेस्टमेंट समिट) कार्यक्रमात द महा ग्लोबल स्टोरी @75 या सत्रात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची मुलाखत झाली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात होत असलेल्या पायाभूत सुविधा, त्यामुळे येणारी गुंतवणूक व उद्योग यांची माहिती दिली. एडीटोरीजचे संस्थापक विक्रम चंद्रा यांनी श्री. फडणवीस यांची मुलाखत घेतली.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सन 2035 मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापनेला 75 वर्षे होत आहेत. यानिमित्ताने आम्ही एक व्हिजन तयार करत आहोत. सुरक्षितता, मजबूत, सामाजिक पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि शाश्वतता यावर लक्ष केंद्रीत करत आहोत. यामुळे राज्याला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने पुढे नेण्यास मदत होत आहे. डॉईश्च बँकेने जाहीर केलेल्या गुंतवणूकविषयक अहवालात नमूद केल्यानुसार, सन 2029 पर्यंत देशातील मोठ्या पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या एकूण गुंतवणुकीपैकी ५० टक्के गुंतवणूक ही राज्यात होणार आहे. विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी पायाभूत सुविधा आवश्यक असून त्याबरोबरच राज्यात शाश्वत विकासावर भर देण्यात येत आहे.
सामाजिक पायाभूत सुविधांचा विचार करता राज्यात सर्वाधिक विद्यापीठे असून नॅक नामांकन असलेल्या सर्वाधिक संस्था राज्यात आहेत. आयआयटी, आयआयएम आहेत, सर्वाधिक खासगी वैद्यकिय व अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. आरोग्य क्षेत्रातही व्यापक बदल होत असून पुढील काही वर्षात राज्यात 50 हजार बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र, सुमारे 1 लाख बेड तयार करण्याचे आमचे नियोजन आहे. शाश्वत विकास करत असताना हरित ऊर्जा, पुनर्वापर अर्थव्यवस्था या क्षेत्रावर जास्त लक्ष केंद्रीत करत आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी राज्यांमधील स्पर्धेचे स्वागत करताना उपमुख्यमंत्र्यांनी भारताच्या आर्थिक विकासात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे प्रतिपादन यावेळी केले. ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे. राज्य शासन राबवित असलेल्या धोरणांमुळे गुंतवणूकदारांचा या राज्यावर विश्वास आहे. देशातील 20 टक्के स्टार्टअप व 25 टक्के युनिकॉर्न हे राज्यात असून महाराष्ट्र हे देशाची स्टार्टअप कॅपिटल आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा क्रमांक एकवर असून यापुढील काळातही तो पहिल्या क्रमांकावरच राहणार असल्याचेही श्री. फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला असून ब्लॉकचेन, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू होत आहे. मुंबई विद्यापीठात एआय सेंटर ऑफ एक्सलन्सी सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. तसेच गुगलच्या सहाय्याने नागपूरमध्येही सेंटर ऑफ एक्सलन्सी सुरू करत आहोत. पुढील काळात संपूर्ण गव्हर्नन्स मॉडेल बदलणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डिजिटल ट्रान्झाशन रोडमॅप तयार केला आहे. त्या दिशेने महाराष्ट्राचीही वाटचाल सुरू आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे अभिलेख (रेकॉर्ड) जतन करण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. त्याचप्रमाणे मेटाव्हर्स तंत्रज्ञानाचाही विविध प्रकल्पांमध्ये वापर वाढविला आहे. येत्या दोन-चार वर्षात मुंबईतील अनेक प्रकल्पांसाठी मेटाव्हर्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागापर्यंत आरोग्य व शिक्षण सेवा पोचविणे सुलभ होत आहे.
ऊर्जा क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून शेती क्षेत्राला वीज पुरविण्यासाठी 16 गिगावॅट वीज ही पुढील काळात सौरऊर्जेद्वारे पुरविण्यात येणार आहे. पुढील दहा वर्षात राज्यातील 50 टक्के वीज ही अपारंपरिक व नवनवीनीकरण ऊर्जेतून निर्माण करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.
मुंबई लवकरच पायाभूत सुविधांच्या बाबतीत सर्वात प्रगत शहर होईल व मुंबई ही देशातील आधुनिक शहरापैकी एक असेल. मुंबई व परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासावर सन 2014 पासून 30 बिलियन डॉलर गुंतवणूक केली आहे. 2027 पर्यंत मुंबई परिसरात 375 किमीचे मेट्रोचे जाळे उभारले जाणार आहे. मुंबईतील कोणत्याही भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी किमान 59 मिनिटांत पोहचता येईल, अशी वाहतूक सुविधा निर्माण करण्यात येत आहे. मुंबई परिसरात सागरी किनारा मार्ग, अटल बिहारी वाजपेयी शिवडी- न्हावा शेवा अटल सेतू, मेट्रोचे जाळे, विरार अलिबाग कॉरिडॉर, वांद्रे वरळी व वरळी -विरार सी लिंक या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे वाहतूक सुविधा गतीमान होणार आहे. ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबई मेट्रो व नवी मुंबई विमानतळ या प्रकल्पामुळे हा परिसर भविष्याची मुंबई असून ती तिसरी मुंबई म्हणून ओळखली जाईल. मुंबईत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे देशातील सर्वात मोठे बंदर आहे. आता वाढवण बंदराची निर्मिती होणार आहे. या बंदरामुळे देशाची, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बदलणार आहे. या सर्व प्रकल्पांमुळे महामुंबई परिसराचा संपूर्ण कायापालट होणार असल्याचेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.