no images were found
अन् मनोज जरांगेंनी मागितली माफी
मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले. विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकाही केली. देवेंद्र फडणवीस मला विष देऊन किंवा इतर मार्गांनी मारणार असल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांना इशारा दिला की, मीच मुंबईत सागर बंगल्यावर (उपमुख्यमंत्र्यांचं निवासस्थान) येतो. परंतु, आंदोलक आणि समर्थकांनी समजूत काढल्यानंतर मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्याऐवजी बेमुदत उपोषण साखळी उपोषणात रुपांतरीत करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच, त्यांनी उपचारही घेतले. या सर्व आरोप-प्रत्यारोपांचे आज (२७ फेब्रुवारी) विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पडसाद उमटले. अधिवेशनादरम्यान, सभागृहात मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मागणी केल्यानंतर जरांगेंचं आंदोलन आणि त्यांचे आरोप यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आपली भूमिका सभागृहासमोर मांडली आहे.