no images were found
व्हेंटिलेटर न मिळाल्याने हलगर्जीपणामुळं तरुणीचा तडफडून मृत्यू
यवतमाळ : जिल्ह्यातील वणी येथील गरीब कुटुंबातील वैष्णवी बागेश्वर (वय 17)या तरुणीचा नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळं मृत्यू झाल्याची घटना घडली. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळं आमच्या लेकीचा मृत्यू झाला, असा तिच्या कुटुंबीयांचा आरोप आहे.
आशियातील दुसऱ्या क्रमांकाचं रुग्णालय म्हणून नागपूर मेडिकलची ओळख आहे. परंतु, इथं सोयी उपलब्ध असताना रुग्ण वाचविण्यासाठी लागणाऱ्या प्रयत्नाची उणीव असल्याचं या घटनेतून पुन्हा एकदा पुढं आलं. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील रहिवासी वैष्णवी राजू बागेश्वर हिची प्रकृती गंभीर झाल्यानं तिला 15 सप्टेंबर रोजी सकाळी मेडिकलच्या वॉर्ड क्र. 48 मध्ये भरती केलं.
वैष्णवीच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या. श्वास घेण्यासही त्रास होत होता. तिला व्हेंटिलेटरची गरज होती. मात्र, व्हेंटिलेटर नसल्याने तिला ‘अॅम्बू बॅग’वर ठेवलं. याची माहिती सायंकाळी मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार यांना देण्यात आली. परंतु, त्यांनाही व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणं शक्य झालं नाही. अखेर तिनं शुक्रवारी दुपारी ‘अॅम्बू बॅग’वरच शेवटचा श्वास घेतला.
तब्बल 20 तास वैष्णवीचे आई-वडील अॅम्बू बॅगचा फुगा वारंवार दाबून आपल्या लेकीला कृत्रिम श्वास देत होते. मात्र, अखेरपर्यंत तिला व्हेंटिलेटर उपलब्ध झालं नाही. अॅम्बू बॅग हातानं दाबून दाबून आमची जीव सोडण्याची वेळ आली होती. आमच्या लेकीला व्हेंटिलेटर मिळालं नाही असं दुःख तिच्या वडिलांनी व्यक्त केलं. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळं आमच्या लेकीचा जीव गेल्याचा आरोपही वैष्णवीच्या नातेवाईकांनी केला आहे.