no images were found
मराठा आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
तमाम मराठा बांधवांसाठीचा जो ठराव होता तो एकमताने सगळ्यांनी मंजूर केला. मला खात्रीने जो प्रस्ताव मांडला गेला आणि विधेयक मांडलं गेलं त्याबाबत मला एक आशा आहे की हे टिकणारं आरक्षण असेल असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मराठा समाजाचंही मी अभिनंदन करतो. सरकाच्या हेतूवर मी आत्ता तरी संशय घेणार नाही. पण मराठा समाजातल्या अनेकांना बलिदान द्यावं लागलं हे नाकारता येणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसल्यानंतर जो लाठीचार्ज झाला आणि डोकी फोडण्यात आली ते व्हायला नको होतं. पहिल्यापासून हा प्रश्न शांततेने सोडवता आला असता. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलंय असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो. एकच प्रार्थना करतो की पूर्वीचे अनुभव लक्षात घेऊन कायद्याच्या निकषांवर टिकणारं आरक्षण मराठा समाजाला मिळेल अशी आशा आहे. शिक्षण आणि नोकरीत आरक्षण दिलं गेलं आहे. मराठा समाजातल्या किती जणांना नोकऱ्या कुठे मिळणार हे सरकारने जाहीर करावं असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीत आरक्षणावरुन दुमत नाही
दोन मतं वगैरे मविआत नाहीत. आम्ही मराठा आरक्षणाला मंजुरी दिली आहे. सरकारने हमी घेतली आहे तरीही ती निवडणुकीच्या तोंडावर घेतली आहे. निवडणूक काढून घेतल्याशिवाय हा निर्णय झाला नाही ना? असा संशय मी आत्ता घेत नाही कारण मला राजकारणात पडायचं नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. माझ्याकडून मी आत्ता फार काही बोलणार नाही संशय मला काही निर्माण करायचा नाही. मुख्यमंत्री कोण आहेत कसे आहेत त्यांचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे. लवकरात लवकर कुठे नोकऱ्या मिळणार ते जाहीर केलं तर आम्हाला आनंद होईल. मराठा आरक्षणावर आम्ही त्यांना पाठिंबा दिलाच आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. सध्या ज्या प्रतिक्रिया समोर येत आहेत त्यावरुन जनतेचा विश्वास मुख्यमंत्र्यांवर नाही असं दिसतंय आता यात मी काय बोलणार? असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
छगन भुजबळ असोत किंवा इतर कुणीही असो दुसऱ्यांच्या हक्कावर गदा न आणता त्यांनी आरक्षण देण्याची हमी घेतली आहे. एक चांगला प्रयत्न आज त्यांनी केला आहे. न्यायालयात हे टिकेल का? आता देवेंद्र फडणवीसांनीही खात्री घेतली होती. आता एकनाथ शिंदेंनी ती खात्री घेतली आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. हे आरक्षण टिकावं ही अपेक्षा आहे. दिलेला शब्द पाळणं हे जर का त्यांची ओळख असती तर भाजपाने मलाही शब्द दिला होता. त्यांना फोडाफोडी करावी लागली नसती असंही उद्धव ठाकरे म्हणाले.