Home शैक्षणिक केंद्रीय निधीचा विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी विनियोग: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

केंद्रीय निधीचा विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी विनियोग: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

4 second read
0
0
21

no images were found

केंद्रीय निधीचा विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी विनियोग: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

 

कोल्हापूर (प्रतीनिधी): केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान अर्थात पीएम-उषा या योजनेअंतर्गत शिवाजी विद्यापीठास जाहीर केलेल्या २० कोटी रुपयांच्या निधीचा विनियोग विहीत सुविधांची निर्मिती व सर्वांगीण विकासासाठी उत्तम पद्धतीने करण्यात येईल, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू (जम्मू आणि काश्मीर) येथून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाच्या अंतर्गत विविध राज्यांतील विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांना ७८ योजनांसाठी ३६०० कोटींहून अधिक निधीची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये विद्यापीठे सक्षमीकरण निधी योजनेअंतर्गत शिवाजी विद्यापीठास २० कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवाजी विद्यापीठ सहभागी झाले. त्या निमित्ताने राजर्षी शाहू सभागृहात उपस्थितांना संबोधित करताना कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने यापूर्वी शिवाजी विद्यापीठास राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये भरीव निधी दिला. शैक्षणिक, संशोधकीय पायाभूत सुविधा विकास, नवोपक्रम, नवसंशोधन आणि वेगळे उपक्रम यांसाठी त्या निधीचा विद्यापीठाने अतिशय योग्य प्रकारे विनियोग केला. यामुळे आता प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियानांतर्गत विद्यापीठे सक्षमीकरण योजनेसाठी हजारहून अधिक विद्यापीठांचे प्रस्ताव दाखल झाले असताना त्यातील अवघ्या ५८ विद्यापीठांची निवड करण्यात आली, त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचा समावेश करण्यात आला आहे. ही आपणा सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे. या प्रोत्साहनासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियानाच्या अनुषंगाने उपस्थितांना अवगत केले. पायाभूत सुविधा विकासासह संशोधन, पेटंट, बौद्धिक संपदा हक्क, उद्योजकता विकास, कौशल्य विकास, स्टार्टअप, नवोपक्रम, नवसंशोधन इत्यादी बाबींसाठी आवश्यक निधी देऊन विद्यापीठांना सक्षम करण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले आहे. त्याच धोरणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून शिवाजी विद्यापीठाची या योजनेसाठी निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मंचावर कुलसचिव डॉ. विलास शिंदे, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, पीएम-उषा समन्वयक डॉ. जी.बी. कोळेकर, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजिस केंद्राचे समन्वयक डॉ. सागर डेळेकर उपस्थित होते, तर उपस्थितांत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी.एम. हिर्डेकर, समाजशास्त्रज्ञ डॉ. आर.बी. पाटील यांच्यासह विविध अधिकार मंडळांचे सन्माननीय सदस्य, अधिविभाग प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. शिंदे यांनी आभार मानले.

आधुनिक शिक्षणासाठी प्रेरक काळ: पंतप्रधान नरेंद्र मोदी

जम्मू येथून केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि अन्य विविध मंत्रालयांच्या योजनांसह जम्मू व काश्मीरसाठी कोट्यवधी रुपयांच्या योजनांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यानंतर त्यांनी देशभरातील विद्यापीठे व शिक्षण संस्थांच्या घटकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. ते म्हणाले, हा नवा भारत आजच्या युवा पिढीला आधुनिक शिक्षण घेण्यास प्रेरित करणारा आहे. या पिढीसाठीच आयआयटी, आयआयएम, आयआयआयटी, एम्स, एनआयटी अशा आधुनिक शिक्षण संस्थांची उभारणी देशभरात करण्यात येत आहे. जम्मू तर आता आयआयटी, आयआयएम आणि एम्स या राष्ट्रीय महत्त्वाच्या तीनही शिक्षण संस्था एकाच शहरात असणारे एकमेव स्थळ बनले आहे. या सर्व बाबींचा युवा पिढीने लाभ घ्यायला हवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमास जम्मूचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासह केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग, खासदार जुगल किशोर आणि गुलाब अली उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय योजनांच्या विविध लाभार्थी महिला व नागरिकांशी प्रत्यक्ष तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…