
no images were found
आपल्या भागात जे पिकते, ते खाणेच शरीरासाठी उपयुक्त: प्रा. रेखा दिवेकर
कोल्हापूर(प्रतिनिधी) : निसर्ग हा आपला सर्वात मोठा काळजीवाहू अन्नदाता आहे. आपल्या परिसरात जे अन्नधान्य पिकते, ते खाणेच आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी आणि उपयुक्त असते. त्यामुळे आपण अशा पदार्थांनाच आपल्या आहारामध्ये महत्त्व देणे योग्य आहे, असा सल्ला आहारतज्ज्ञ प्रा. रेखा दिवेकर यांनी दिला.
शिवाजी विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र अधिविभागाने या वर्षी हीरकमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. त्याच बरोबर या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अधिविभागासाठीचा पुरस्कारही पटकावला आहे, या निमित्ताने ‘अनलॉक हेल्थ थ्रू युअर किचन’ या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण प्रा. दिवेकर (मुंबई) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
प्रा. दिवेकर म्हणाल्या, आजच्या धकाधकीच्या जीवनात आपले खाण्याकडे फारसे लक्ष नसते. यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होत चालली आहे. खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे वंध्यत्व, पीसीओडी, लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब आणि असे अनेक छोटे-मोठे आजार तरूण पिढीमध्ये दिसत आहेत. हे सर्व आजार आपण आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धती बदलून सहज कमी करू शकतो. आपले शरीर हे अन्नमय कोशापासून बनलेले आहे, “यथा अन्नम्, तथा मनम्’, जे आपण खातो, तसेच आपण बनत जातो, अन्न हे तारक आणि मारक दोन्हीही असू शकते. त्यासाठी काही दक्षता घ्याव्यात, जसे की, प्लास्टिकच्या ताटांचा वापर जेवणासाठी करू नये. स्वयंपाकासाठी अॅल्युमिनिअमच्या भांड्यांचा वापर करू नये. पाश्चात्य खादयसंस्कृतीतील पिझ्झा, बर्गर, कार्बोनेटेड ड्रिंक्स इत्यादींचे प्रमाण अत्यल्प असावे किंवा ते टाळावेच. कारण ते आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.
डॉ. दिवेकर पुढे म्हणाल्या, ऋतुमानानुसार उगवणाऱ्या भाज्या, स्थानिक जमिनीत उगवणारी फळे, भरडधान्ये अर्थात ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, कुळीथ यांचा वापर रोजच्या जेवणात असावा. तसेच, घरी बनविली जाणारी वेगवेगळी सरबते, पेये यांचा आस्वाद घ्यावा. शरीरातील पेशी आणि अवयवांच्या तंदुरूस्तीसाठी व मेंदुच्या कार्यासाठी तूप महत्त्वाचे आहे. दररोज सर्व वयोगटातील लोकांनी तुपाचे सेवन केले पाहिजे. ज्या भौगोलिक भागात आपण राहतो, त्या भागात जे पिकतं, ते आपल्या शरीरासाठी चांगले असते. ज्या पद्धतीचा आहार आपल्या पूर्वजांनी घेतला, तोच आपल्यासाठीही आवश्यक असतो.
कृत्रिम, रासायनिक प्रिझर्वेटीव्ह घालून टिकवलेल्या अन्नपदार्थांपेक्षा जे टिकवण्यासाठी मीठ, साखर किंवा लिंबाचा रस वापरला आहे, असे अन्नपदार्थ शरीरास हानीकारक नसतात. जे पदार्थ खूप कमी वेळात नाश होतात, त्यांच्यात सर्वाधिक पोषणतत्त्व असते, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी प्रा. दिवेकर यांनी विद्यार्थ्यांशीही संवाद साधला आणि त्यांच्या शंकांचे समाधान केले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक, निमंत्रक व प्राणिशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. आशिष देशमुख यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. व्याख्यानासाठी प्राणिशास्त्र अधिविभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संशोधक विद्यार्थी-विद्यार्थीनी, पालक व एम.एस्सी भाग १ व २ चे विद्यार्थी तसेच अन्नतंत्रज्ञान विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सानिका हेबळे यांनी केले, तर हिना शेख यांनी आभार मानले.