no images were found
चर्मकार प्रर्वगातील 25 हजार युवक-युवती आणि महिलांना स्वरोजगाराची संधी
कोल्हापूर : लिडकॉम मुंबई आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्यात चर्मकार प्रवर्गातील युवक-युवती आणि महिलांना दर्जेदार उद्योजकता विकास आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे 3 वर्षात 25 हजार चर्मकारांना प्रशिक्षण मिळेल. या करारावर लिडकॉमचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्ज्योती गजभिये आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे केंद्र प्रमुख तथा राज्य समन्वयक हेमंत वाघमारे यांनी स्वाक्षरी केली.
या प्रशिक्षणात चर्मकार उद्योगातील व्यवसाय योजना, वित्त व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रिया, विपणन आणि ग्राहक सेवा यासह विविध विषयांचा समावेश असेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षितांना महामंडळाच्या योजना आणि इतर सरकारी योजनांचा लाभ घेता येईल.
या करारामुळे चर्मकार प्रर्वगातील सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींना आणि महिलांना उद्योजक बनण्याची संधी मिळेल. या कराराच्या वेळी लिडकॉमचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्ज्योती गजभिये यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांचे आभार व्यक्त केले. चर्मकार प्रर्वगातील युवक-युवतींनी आणि महिलांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री. गजभिये यांनी केले आहे.
या वेळी लिडकॉमच्या व्यवस्थापिका स्नेहलता नरवाने, सहव्यवस्थापक एन.एम. पवार, कंपनी सेक्रेटरी प्रदीप रथ, आणि प्रशासकीय अधिकारी संगीता पराते उपस्थित होते. एमसीईडी मार्फत राज्य समन्वयक हेमंत वाघमारे व युवराज इंगोले उपस्थित होते.