Home मनोरंजन अशोक’, माझे ‘श्रीमान योगी’, -निवेदिता सराफ

अशोक’, माझे ‘श्रीमान योगी’, -निवेदिता सराफ

1 second read
0
0
33

no images were found

अशोक’, माझे ‘श्रीमान योगी’, -निवेदिता सराफ

मुंबई-ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना अत्यंत प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर अशोक सराफ यांच्या पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, खूपच भारावून गेले आहे. अतिशय योग्य व्यक्तीला हा महाराष्ट्रातील उच्च पुरस्कार मिळणं ही अभिमानाची गोष्ट आहे. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री आणि अशोकच्या सर्व चाहत्यांचे खूप खूप आभारी आहे. अशोकचा जीव त्यांच्या कलेत आहे. त्यामुळे फॅन्सनीही त्यांच्यावर भरभरून प्रेम करत कायम त्यांच्या कलाकृतींना उत्तम प्रतिसाद दिला आहे. या पुरस्कारात त्यांचे सहकलाकार, दिग्दर्शक, निर्माते या सर्वांचाच वाटा आहे.
अशोक यांना चाहते अभिनयातील ‘सम्राट अशोक’ म्हणतात, पण मी त्यांना ‘श्रीमान योगी’ म्हणते. कारण सगळ्यात असूनही ते सगळ्यापासून अलिप्त राहतात. त्यांची हि वृत्तीच त्यांना इथवर घेऊन आली आहे. नट म्हणून ते चतुरस्र अभिनेते आहेत. प्रेक्षकांना जरी त्यांची कॉमेडी आवडत असली तरी त्यांनी कायम विविधांगी व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यांनी कधीच माझ्यासमोर कोण, हा सीन कोणाचा, सहकलाकाराला किती फुटेज, मला किती फुटेज यांचा विचार केला नाही. सहकलाकाराच्या सीनमध्ये ते त्याला पूर्ण बॅटिंग करण्याची संधी देतातच, पण सपोर्टही करतात. ते कलाकृतीवर प्रेम करणारे मनस्वी कलाकार आहेत. ते सर्वांना सोबत घेऊन मोठे झाले. एखादी अॅडिशन सुचली तर सहकलाकाराला सांगण्याचा उदात्तपणा त्यांच्या ठायी आहे. एखाद्या माणसाचा स्वत:च्या अभिनयक्षमतेवर पूर्ण विश्वास असतो, तेव्हाच तो इतक्या निरपेक्ष भावनेने वागू शकतो. अशोकचा तसा आपल्या कलेवर आणि क्षमतेवर विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी इतरांकडे किती काम याकडे कधीच लक्ष दिलं नाही.
हिरो म्हणून काम करताना एखादा उत्तम चरित्र रोल आल्यास तो देखील त्यांनी केला हे आजच्या कलाकारांनी घेण्यासारखं आहे. एका वयात पोहोचल्यानंतर हिरो ते चरित्र भूमिका हे ट्रान्झिशन त्यांच्यासाठी खूपच सोपं गेलं. अशोकच्या प्रदीर्घ कारकिर्दीतील अमूक आवडलं हे सांगणं खूप कठीण आहे, पण मला त्यांचा ‘खरा वारसदार’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘वजीर’, ‘अरे संसार संसार’ या चित्रपटांतील भूमिका तसेच ‘डार्लिंग डार्लिंग’ नाटकातील भूमिका अशा बऱ्याच व्यक्तिरेखा भावल्या. एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्या भूमिकेवर अन्याय होईल.
अशोक खासगी आयुष्याबद्दल अवाक्षरही बोलत नाहीत. त्यामुळेच त्यांना पुस्तक काढायचं नव्हतं, पण ‘मी बहुरूपी’ हे पुस्तक काढावं हा माझा आग्रह होता. त्यांची कारकिर्द शब्दरूपात लोकांपर्यंत पोहोचवायची होती. यासाठी मी त्यांना फक्त तुमच्या कारकिर्दीबद्दल लिहू असं सांगितलं. त्यामुळे पुस्तकात कुठेही त्यांच्या पर्सनल गोष्टी नाहीत. करियरसोबत उलगडत जाणारं थिएटर आणि दूरदर्शनचा काळ हाच पुस्तकाचा आवाका ठेवल्याने ग्रंथालीच्या सहाय्याने पुस्तक घडू शकलं. त्यांच्या पुस्तकाचं ‘मी बहुरूपी’ हे शीर्षक अगदी समर्पक आहे. कारण त्यांनी नेहमी विविधांगी भूमिकांवर भर दिला. महाराष्ट्राने आपल्या लाडक्या कलावंताला दिलेल्या या पुरस्काराचं वर्णन करण्यासाठी आणि आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…