no images were found
मीरा रोडच्या घटनेत तेरा आरोपी ताब्यात. – देवेंद्र फडणवीस
मुंबईः मुंबईतल्या मीर रोड परिसरामध्ये सोमवारी रात्री दोन गटांमध्ये राडा झाला होता. या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींवर कठोर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.
माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, मीरा भाईंदर प्रकरणात कठोर कारवाईचे निर्देश पोलिसांना दिले आहे. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. आरोपींना अटक केलेली असून सीसीटीव्ही फुटेज तपासून लोकांवर कारवाई केली जाणार आहे.
मीरा-भाईंदरमधील नयानगर भागात काल रात्री घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती काल रात्रीच घेतली आहे. सोमवारी पहाटे 3.30 वाजेपर्यंत मी मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांच्या सातत्याने संपर्कात होतो. आरोपींवर कठोर कारवाईचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.
या प्रकरणात आतापर्यंत 13 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, सीसीटीव्ही फुटेज तपासून अन्य आरोपी ओळखण्याची प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था कुणी बिघडविण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारत मीरा रोडच्या नया नगर भागामध्ये दोन गटात वादावादी झाली. पहिल्या गटातील तरुणांनी तीन ते चार वाहनांमधून घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यामुळे तिथल्या दुसऱ्या गटासोबत भांडण सुरु झालं. पुढे या घटनेत गाड्यांची तोडफोड आणि दगडफेक झाली.
या प्रकरणी पोलिसांनी १३ आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. पोलिसांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलं आहे. सोशल मीडियावरील मेसेजवर खात्री केल्याशिवाय विश्वास ठेवू नये, असंही नयानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सुपे यांनी सांगितलं.