
no images were found
मोदींनी मालदीवचे समुद्रनाट्य निर्माण केले -उद्धव ठाकरे
गेल्या काही दिवसांपासून मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय पर्यटन व्यवसायासंदर्भात केलेल्या विधानांनी जोरदार चर्चा आहे. याचा मोठा फटकाही मालदीवला बसला असून आता तिथल्या पर्यटन व्यवसायावर मोठं संकट ओढवल्याचं सांगितलं जात आहे. कारवाई म्हणून मालदीवनं या तीन मंत्र्यांची हकालपटी करत भारताच्या झालेल्या अवमानाचं प्रायश्चित्तही केलं. या पार्श्वभूमीवर भारतात राजकीय वर्तुळात टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. ठाकरे गटानं या संपूर्ण प्रकरणाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक टोला लगावला आहे. मात्र, तसे करताना मोदींवर टीका करणाऱ्या मालदीवच्या मंत्र्यांची निर्भर्त्सनाही करण्यात आली आहे.
देशाच्या राजकारणात सध्या ‘जोकरगिरी’ चालू आहे”
मालदीवच्या एका मंत्र्यांनी टिप्पणी करताना वापरलेल्या ‘जोकर’ या शब्दावरून सामना अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांना टोला लगावण्यात आला आहे. “हिंदुस्थानच्या राजकारणात सध्या ‘जोकरगिरी’ नक्कीच सुरू आहे. लोकशाहीच्या छाताडावर नाचत जे विदूषकी प्रकार सुरू आहेत ते निंदनीय आहेत. मोदी-शहांचे राज्य देशावर आणि काही राज्यांत आल्यापासून राजकारणाची पातळी व भाषा खाली घसरली आहे. अर्थात ते काहीही असले तरी हिंदुस्थानच्या पंतप्रधानांवर खालच्या भाषेत टीका करणे हे विदेशातील मंत्र्यांना शोभत नाही”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
दरम्यान, लक्षद्वीपच्या किनाऱ्यावर मोदींनी काढलेल्या फोटोंवरूनही ठाकरे गटानं खोचक टीका केली आहे. “एखाद्या व्यावसायिक मॉडेलला लाजवेल अशा अप्रतिम ‘पोझेस’ मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानिमित्त प्रसिद्ध झाल्या व त्यावर देशभरातील भाजप भक्तांनी प्रतिक्रिया दिल्या. लक्षद्वीपचा शोध नव्यानेच लागला व मोदी हेच त्या शोधाचे जनक आहेत, असा शोध त्यातील काही अंधभक्तांनी लावला”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
दरम्यान, मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यामागे राजकीय गणित असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. “लक्षद्वीप हा अनेक समुद्री बेटांचा समूह असून तेथे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहम्मद फैजल हे खासदार म्हणून निवडून आले आहेत. भारतीय जनता पक्षाला येथे फारसे स्थान नाही. मोदी यांनी येथे पाय ठेवताच लक्षद्वीपच्या विकासासाठी साधारण एक हजार कोटी रुपयांचे ‘पॅकेज’ जाहीर केले. ही तेथील एका लोकसभा जागेची तयारी म्हणावी लागेल”, अशी टिप्पणी ठाकरे गटानं केली आहे.
“लक्षद्वीपच्या निमित्ताने मोदी भक्तांनी मालदीवला डिवचले. मालदीवच्या निमित्ताने लक्षद्वीपच्या एका खासदारकीच्या जागेवर टिचकी मारली. यापुढे लक्षद्वीपच्या समुद्रतटांवर अनेक देशभक्त नटनट्यांचा वावर वाढू लागेल. पर्यटनास चालना मिळेल व हे सर्व मोदींमुळेच घडले, असा डंका पिटून तेथील एकमेव लोकसभा जागेवर प्रचार केला जाईल. मोदी यांचा लक्षद्वीप दौरा हा ‘सोची समझी’ राजकीय रणनीतीचाच भाग असावा. २०२४ च्या राजकीय लढाईत एक-एक जागेचे महत्त्व आहे व ‘अबकी बार चारसे पार’चे उद्दिष्ट गाठणे सोपे नाही, किंबहुना कठीणच आहे. म्हणून लक्षद्वीपच्या एकमेव जागेसाठी मोदी व त्यांच्या प्रचारकांनी हे समुद्रनाट्य निर्माण केले”, असा दावा ठाकरे गटानं केला आहे.