no images were found
‘तेजस’ लढाऊ विमानांवरील टीका अनाठायी!
‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत भारतीय बनावटीची अत्याधुनिक शस्त्रास्त्रे तयार करणे किंवा ते शक्य नसल्यास त्यांची मुक्त आयत व विदेशातून भारतात केली गेलेली आयात व तदनंतरची निर्मिती हे संमिश्रित धोरण २०१९पासून अमलात आले आहे. आजमितीस भारतात लष्करी उपग्रह, मोठ्या वजनी/ उखळी तोफा, असॉल्ट/ स्नायपर रायफल्स, विविध पल्ल्यांची क्षेपणास्त्रे/ रॉकेट्स, वेपन लोकेटिंग रडार्स, असॉल्ट शिप्स/ विमानवाहू जहाज, टेहाळणी/ मारक ड्रोन, हेलिकॉप्टर, लढाऊ विमाने अशा विविध प्रकारच्या संरक्षणसामुग्रीची निर्मिती होते आहे. यात पाश्चात्य गुंतवणूक/ निर्मिती आणि स्वयंनिर्माण दोन्हींचा समावेश आहे. आत्मनिर्भर भारत संकल्पनेचा सर्वांत जास्त फायदा, लढाऊ विमानांची लक्षणीय कमतरता असलेल्या भारतीय हवाई दलाला झाला आहे. लढाऊ विमानांच्या या कमतरतेबद्दल प्रसारमाध्यमांत वेळोवेळी चर्चा होतच असतात.
हवाई दलाच्या सततच्या मागणीनुसार २०१९-२२ दरम्यान भारतात फ्रान्सकडून ३० ‘राफेल’ विमानांची आयात झाली. त्या खरेदीनंतरही भारतीय हवाई दलाला आपले ३२ स्क्वाड्रन्स कार्यरत करण्यासाठी जवळपास १२५ अतिरिक्त फायटर विमानांची आवश्यकता होती. योग्य विचारविमर्शानंतर, मिग/ जॅग्वार्सच्या कालबाह्य होत असलेला ताफा बदलण्यासाठी, चौथ्या पिढीतील फायटर एयरक्राफ्ट म्हणून तेजसची निवड करण्यात आली. ही विमाने ‘हिंदुस्तान एरॉनॉटिक लिमिटेड’मध्ये (एचएएल) तयार होतात. ‘एचएएल’कडे ९५ ‘तेजस’ विमानांची मागणी नोंदवली गेल्याची बातमी ऑगस्ट २०२३ मध्ये आली होती. परंतु तेजसच्या ‘एचएएल’मधील निर्मितीला विलंबित उत्पादन कालावधी , विमानाच्या उड्डाण शक्तीतील तथाकथित कमतरता, त्याची शस्त्र क्षमता आणि जलद हालचालीतील कमतरता ; या कारणांसाठी प्रचंड टीकेला सामोर जावे लागले. या टीकेचे मूळ राजकीय द्वेषातही असल्याने त्यावर भाष्य करणे या लेखाच्या आवाक्यापल्याड आहे. पण टीकाकारांनी तेजसची सामरिक क्षमता, हवाई दलाची निकड आणि संरक्षण खात्यावरील आर्थिक मर्यादांकडे दुर्लक्ष केल्याचे मात्र प्रत्ययास येते. प्रत्यक्षात, हवाई दलाच्या ज्या वैमानिकांनी तेजसचे मूलभूत आणि नंतर प्रदीर्घ उड्डाण परीक्षण केले होते त्यांना त्या विमानाच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. म्हणूनच हवाई दलाला ही विमाने हवी आहेत.
तेजसच्या उत्पादनाच्या वेळापत्रकाचा विचार केल्यास हे आढळून येते की, चौथ्या पिढीतील या सुपरसॉनिक फायटरच्या निर्मितीत नक्कीच काही चढउतार झाले. सुरुवातीला विमानांचे प्रत्यक्ष उत्पादन वेळापत्रकापेक्षा काही प्रमाणात संथ होते. पण हवाई दलाचे वैमानिक, तेजस विमानाच्या क्षमतेबद्दल संपूर्णतः समाधानी आहेत. हवाई दलात येणारी ९५ नवीन तेजस एमके १ विमाने, आपल्या संरक्षणदलांची मारक क्षमता वृद्धिंगत करतील याची त्यांना खात्री आहे. भारतीय हवाई दलाच्या ४५ फ्लाइंग डॅगर्स आणि १८ फ्लाइंग बुलेट या दोन स्क्वॉड्रन्समध्ये मिळून सध्या ३० पेक्षा जास्त तेजस विमाने सामरिकदृष्ट्या कार्यरत/ तैनात (ऑपरेशनल डिप्लॉयमेंट) आहेत. तेजस विमानांचे प्रोटोटाइप आणि कार्यरत स्क्वाड्रन्समधील विमान चालवणाऱ्या/ वापरणाऱ्या हवाई दल वैमानिकांना तेजस विमानाच्या कार्यक्षमतेबद्दल वाटणारा अदम्य विश्वास हेच यामागील कारण आहे असे म्हटल्यास ते वावगे होणार नाही.
तेजस विमान विकसित करण्यासाठी एचएएलला थोडा जास्तच वेळ लागला यात शंका नाही. पण तुलनात्मकदृष्ट्या त्यांचे उत्पादन वेळापत्रक हे फ्रान्सच्या राफेल आणि अमेरिकी एफ-३५ यांच्यासारख्या आधुनिक फोर्थ जनरेशन फायटरसारखेच आहे. फ्रान्सच्या राफेल प्रोटोटाईप विमानाने १९८६ मध्ये पहिली गगनभरारी घेतली होती, पण फ्रेंच हवाई दलात त्याचा प्रवेश २००१ मध्ये झाला. अमेरिकन एफ ३५चे पहिले उड्डाण २०००मध्ये झाले होते, पण आणि यूएस मरीन कोअरमधे हे विमान कार्यरत होण्यासाठी २०१५पर्यंत वाट पाहावी लागली. त्याचप्रमाणे तेजसच्या विकासालाही १५-१६ वर्ष लागली. तेजसच्या तंत्रज्ञान प्रात्यक्षिकांनी २००१मधे प्रथम उड्डाण केले. जुलै २०१६मध्ये पहिली दोन विमाने भारतीय हवाई दलात दाखल झाली आणि २०२० पर्यंत वर दोन स्क्वाड्रन्स कार्यरत झाले. राफेल आणि एफ-३५ या दोघांनीही त्यांच्या सुरुवातीच्या आवृत्त्यांत बऱ्याच मर्यादित क्षमतेसह उड्डाणे केली होती. त्यावर त्यांच्या नंतरच्या आवृत्यांमधे तोडगा काढण्यात आला, हेच तेजसच्या बाबतीतही घडले, घडते आहे