no images were found
लोकसभेला किती जागा? विधानसभाही महायुतीत लढणार?- फडणवीस
नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक नागपुरातील कोराडी येथे पार पडली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस यांनी आपण लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकाही महायुतीतील तीनही पक्ष एकत्रित लढवणार आहोत, अशी घोषणा केली. तसंच आपला विजय होणार असला तरी गाफील राहू नका, असा कानमंत्रही पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना फडणवीस म्हणाले की, “महाविजय २०२४ हे अभियान आपण सुरू केलं आहे. या अभियानाच्या दृष्टीने आपण खालपर्यंत संघटनेची रचना तयार केली आहे. विजयाची भावना घेऊन आपल्याला मैदानात उतरायचं आहे, मात्र कोणीही अतिआत्मविश्वास ठेवता कामा नये. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे पुढील ९ ते १० महिने आपल्याला पक्षासाठी द्यायचे आहेत. तीनही पक्ष दोन्ही निवडणुका एकत्र लढवणार आहेत. तुमच्या मनात असतील तितक्या जागा आपल्याला मिळणारच आहे, त्यामुळे तुम्ही ती चिंता करू नका,” असा विश्वास फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला.
“विकसित भारत यात्रा सुरू झाली आहे. ही यात्रा खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकांशी जोडणारी यात्रा आहे. हा फक्त संकल्प यात्रेचा रथ नसून नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीचा रथ आहे. जी गॅरंटी लोकांपर्यंत पोहोचत आहे, जी गॅरंटी फक्त शब्दांपुरती मर्यादित नाही. त्यामुळे ही यात्रा लोकांपर्यंत पोहोचवणं, केंद्र सरकारच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणं, ही यात्रा ज्या भागात जात आहे, तिथं योग्य पद्धतीने स्वागत होत आहे का, लोक उपस्थित राहात आहेत का, हे पाहणं भाजपाच्या कार्यकर्त्यांचं काम आहे. त्यामुळे तुम्ही ते लक्षपूर्वक केलं पाहिजे,” असं आवाहन फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना केलं.
“महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांना नरेंद्र मोदींचं आकर्षण आहे. अनेकदा असं सांगितलं जातं की मोदींचं आकर्षण फक्त हिंदी भाषिक राज्यातील लोकांना आहे. मात्र हे खोटं आहे. महाराष्ट्रातील जनतेला मोदींचं आकर्षण नसतं तर लोकसभेच्या दोन निवडणुकांमध्ये आपण ४२ जागा जिंकू शकलो नसतो. यातील काही अशा जागा आपण जिंकल्या की ज्यांचा आपण कधी विचारही केला नव्हता,” असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.