
no images were found
पाकिस्तानच्या विजयाच्या जल्लोषात दोघांचा गोळी लागून मृत्यू
पेशावर : पाकिस्तानातील पेशावरमध्ये संघाच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या लोकांनी हवेत गोळीबार केला. या गोळीबारात जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सामन्यादरम्यान मैदानावरील खेळाडूंमध्ये ही वाद पाहायला मिळाला. स्टेडियममध्ये देखील काही लोकं एकमेकांना भिडली.
आशिया कपच्या लढतीत पाकिस्तान संघाच्या विजयाचा आनंद साजरा करताना अनेक शहरांमध्ये हवाई गोळीबार करण्यात आला. पेशावर शहरात 2 जणांचा मृत्यू झाला आहे, तर पोलिसांनी गोळीबाराच्या आरोपाखाली सुमारे 41 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पेशावरमधील मतनी अदेजाई भागात घडली. काही लोक गोळीबार करून आनंद साजरा करत होते. ज्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला. पाकिस्तानच्या विजयानंतर हवाई गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला आहे. यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी अवैध शस्त्राविरोधात मोहीम राबवण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानची अवस्था अशी आहे की येथे खुलेआम अवैध शस्त्रे विकली जातात.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना जितका रोमांचक होता, तितकाच खळबळजनक प्रकारही घडला आहे. सामन्यादरम्यानच एका पाकिस्तानी खेळाडूची अफगाणिस्तानच्या खेळाडूसोबत बाचाबाची झाली. तो अफगाणिस्तानच्या खेळाडूला बॅटने मारण्यासाठीही धावला. पाकिस्तानच्या विजयाने संतप्त झालेल्या अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी खुर्च्या फोडून पाकिस्तानी चाहत्यांना मारहाण केली. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.