no images were found
शिवाजी विद्यापीठात निवडणूक साक्षरता मंच सक्षमीकरण व प्रशिक्षण कार्यक्रम कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर(प्रतिनिधी) – शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग तसेच कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्हा प्रशासन आणि सोशल ॲक्शन अकाउंटेबिलिटी फोरम (SAAF) यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू सभागृह या ठिकाणी आयोजन केले होते. या कार्यशाळेसाठी अध्यक्ष म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के उपस्थित होते. कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. टी. एम. चौगले यांनी सर्व मान्यवरांचे कार्यशाळेमध्ये स्वागत केले आणि कार्यशाळेचा उद्देश विशद केला. शिवाजी विद्यापीठाचे प्र कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील व कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. राहुल रेखावार व सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्यासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी आणि SAAF संस्थेचे संचालक लेफ्टनंट कर्नल पंजाबराव देशमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यातील ६४ महाविद्यालयात स्थापन झालेल्या निवडणूक साक्षरता मंच यांचे सामंजस्य करार प्रदान कार्यक्रम आणि प्रशिक्षण व सक्षमीकरण या उपक्रमासाठी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन केले.
कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. राहुल रेखावार यांनी मतदार नोंदणी, मतदार जागृती आणि सर्व शैक्षणिक संस्थांचा या प्रक्रियेतला सहभाग वाढावा यासाठी आवाहन केले. सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनीही मतदान नोंदणी आणि निवडणूक जनजागृती बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. विद्यापीठाचे प्र कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून निवडणूक साक्षरता मंचाचे सक्षमीकरण आणि भविष्यात विद्यापीठाकडून या उपक्रमास आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची भूमिका मांडली. SAAF चे संचालक लेफ्टनंट कर्नल पंजाबराव देशमुख यांनी निवडणूक प्रक्रिये बाबत साफ संस्थेने घेतलेला पुढाकार बद्दल आणि भविष्यात निवडणूक साक्षरता व त्यासाठी करणार असलेल्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांनी निवडणूक साक्षरता मंच सक्षमीकरण करण्यासाठी अनेक उपाय सुचवले. मतदार नोंदणीसाठी प्रत्येक टप्प्यावर घ्यायची काळजी आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांबरोबरच महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन आपल्या महाविद्यालयातील, कुटुंबातील आणि समाजातील वंचित मतदारांना या प्रक्रियेत सामील होण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय, SAAF संस्था आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारावर सह्या झाल्या व आदान प्रदान कार्यक्रम पार पडला. कार्यशाळेसाठी शिवाजी विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, नोडल अधिकारी आणि कॅम्पस आंबेसिडर्स उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. पोपटराव माळी आणि प्रा. संदीप पाटील यांनी केले तर आभार सार्थक कोळेकर यांनी मानले.