
no images were found
सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राकडून एकाचवेळी चार पुस्तिका प्रकाशित
कोल्हापूर,(प्रतिनिधी):- संस्थेचे महत्त्व वाढवणारे उपक्रम निश्चितच महत्त्वाचे असतात. त्या अनुषंगाने सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या याचार पुस्तिकांचे महत्त्व अधोरेखित करावे लागेल, असे मत कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केले. सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्यावतीने आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी प्रा. डॉ. रणधीर शिंदे लिखित ‘महाराष्ट्रातील समाज परिवर्तन व वाङ्मय’, श्री. किशोर बेडकिहाळ लिखित “महात्मा गांधींचा सामाजिक समावेशनाचा दृष्टिकोन”, डॉ. कैलास बवले लिखित “उच्च संस्थांमधील ग्रामीण विकासाचा दृष्टिकोन आणि डॉ. विनोद पवार लिखित “भारतीय संविधान आणि अल्पसंख्याकांचे हक्क” या पुस्तकांचे त्यांचे हस्ते प्रकाशन झाले.
यावेळी प्र- कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील, तसेच पुस्तकांचे लेखक श्री. किशोर बेडकिहाळ, डॉ. कैलास बवले, डॉ. विनोद पवार व प्रा. डॉ. रणधीर शिंदे, यांनी मनोगत व्यक्त केले.
प्र- कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील म्हणाले, सामाजिक समावेशन अभ्यास केंद्र विद्यापीठास समाजापर्यंत पोहचविण्याचे काम करीत असून या पुस्तकांच्या माध्यमातून सामाजिक विचार बांधून ठेवण्याचे महत्त्वाचे काम घडून आले आहे.
श्री. बेडकिहाळ म्हणाले, विद्यापीठाने या पुस्तकांच्या माध्यमातून समाजास वैचारिक खाद्य देण्याचे काम केले आहे. गांधींचे समावेशनाचे विचार समजून घेण्यासाठी “महात्मा गांधींचा सामाजिक समावेशनाचा दृष्टिकोन” हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे.
डॉ. रणधीर शिंदे आपल्या पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, महाराष्ट्रातील समाज परिवर्तन व जागृतीसाठी हे पुस्तक महत्त्वाचे असून कोल्हापूरातील प्रभाकरपंत कोरगावकर यांच्या दानशूर वृत्तीच्या व त्यांनी सामाजिक चळवळीला दिलेले पाठबळ तसेच महाराष्ट्रातील समाज परिवर्तनातील साहित्याचे महत्त्व व त्याच्या पाऊलखुणा व या पुस्तकात बद्ध करण्यात आलेल्या आहेत.
डॉ. कैलास बवले आपल्या पुस्तकाविषयी बोलाताने म्हणाले, या पुस्तकात मांडण्यात आलेल्या नॉलेज-कॉलेज-व्हिलेज व ज्ञानग्राम या संकल्पनांना कृतीची जोड देणे आवश्यक असून त्याद्वारे ग्रामीण समाज परिवर्तन शक्य आहे.
डॉ. विनोद पवार म्हणाले, आयडिया ऑफ इंडिया समजून घेण्यासाठी “भारतीय संविधान आणि अल्पसंख्याकांचे हक्क” हे पुस्तक महत्त्वपूर्ण आहे.
स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अविनाश भाले यांनी केले. शिवाजी युनिव्हर्सिटी प्रेसने पुस्तकांचे प्रकाशन केले असून यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, एस. डी. पवार, डॉ. दीपा श्रावस्ती, डॉ. किशोर खिलारे, शरद पाटील, सुरेश खांडेकर व जायंट्स क्लब कोल्हापूरचे पदाधिकारी उपस्थित होते.