
no images were found
स्नेहा भट्टाचार्यच्या ‘मंगलवार’ या पहिल्या स्वतंत्र गाण्याने भारावून गेली नीति मोहन!
गतवर्षीच्या आवृत्तीच्या उदंड यशानंतर ‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प’ या गायनविषयक रिअॅलिटी कार्यक्रमाचे दणक्यात पुनरागमन झाले असून त्यात हिमेश रेशमिया, नीति मोहन आणि अनु मलिक हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य नारायण करणार आहे. गेले अनेक आठवडे स्पर्धकांच्या उत्कृष्ट गायनानंतर येत्या रविवारचा ‘बेस्ट फूट फॉर्वर्ड’ हा विशेष भाग ही प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.
विशेष म्हणजे, रविवार, 29 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांना एक स्पर्धक स्नेहा भट्टाचार्यचे एक अप्रतिम गाणे ऐकण्याची संधी मिळणार आहे. दर आठवड्याला एका स्पर्धकाला आपले स्वतंत्र गाणे ध्वनिमुद्रित करण्याची सुवर्णसंधी मिळत असते. गेल्या आठवड्यात निष्ठा शर्मा या स्पर्धकाला हा मान मिळाला होता, तर या आठवड्यात स्नेहा भट्टाचार्यला हा मान मिळत आहे. स्नेहाने नामवंत संगीतकार विवेक कर यांनी संगीत दिलेले मंगलवार हे गाणे ध्वनिमुद्रित करून आपले स्वप्न साकारले आहे. या कार्यक्रमाच्या मंचावर तिला हे गाण्यासाठी परीक्षकांनीच क्लॅप दिला आणि त्यानंतर तिने आपल्या सुरेल गायकीने सर्वांना मंत्रमुग्ध केले.
नीति मोहन म्हणाली, “स्नेहा, दर आठवड्याला तुझं गाणं झाल्यावर या मंचाजवळ येऊन तुझ्या गाण्याची प्रशंसा करणं मला भाग पडतं. तू कसली रॉकस्टार गायक आहेस गं! मी तर तुझ्या प्रेमातच पडले आहे. तू खरंच खूप असामान्य आहेस!” स्नेहा भट्टाचार्यच्या सुरेख गायकीची प्रशंसा सर्वांनीच केली असली, तरी आता पुढील स्वतंत्र गायक कोण होईल, हे पाहणे प्रेक्षकांसाठी खूपच रंजक ठरेल.