no images were found
सत्तासंघर्षाची पुढची सुनावणी २७ सप्टेंबरला
सर्वोच्च न्यायालयात सध्या राज्यातल्या सत्तासंघर्षाची लढाई सुरू असून ही लढाई काही कारणास्तव बऱ्याचदा पुढे ढकलली जात होती. दरम्यान कोर्टात आज पुन्हा एकदा या सुनावणीला पुढची तारीख देण्यात आली. . घटनापीठाने 27 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाला कार्यवाही करण्याची परवानगी देण्याबाबत आदेश देण्याच्या मागणीसाठी शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर आज सुनावणी झाली. पुढील सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. पुढील सुनावणीत सुप्रीम कोर्ट महत्त्वाचे आदेश देण्याची शक्यता आहे.
२७ सप्टेंबरपर्यंत या सगळ्या प्रकरणाची तपशीलवार सुनावणी घेऊ, निवडणूक आयोगाबद्दलचे सर्वांचे युक्तिवादही त्याच दिवशी ऐकून घेतले जातील, तसंच त्यावर सविस्तर सुनावणी होईल; असे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचे अध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सांगितल्यानंतर उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी हे चुकीचं असल्याचा दावा केला आहे. ज्यांना विधानसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरवले जाऊ शकते, त्यांना निवडणूक आयोगाकडे जाण्याचा अधिकार नाही. शिंदे गटाला निवडणूक चिन्ह मिळालं की, सगळा कारभार व्यर्थ ठरेल, असा युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलांनी केला आहे. तर आमदार असो, वा नसो, पक्षावर दावा करुच शकतो, असं शिंदेंचे वकील नीरज कौल यांच्याकडून सांगण्यात आलं.