
no images were found
कर्नाटक राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांचे निधन
बेळगाव (कर्नाटक) : कर्नाटक राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश विश्वनाथ कत्ती (वय 61, रा. बेल्लद बागेवाडी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. बंगळुरूमधील डॉलर्स कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी रात्री (मंगळवार) 10.30 वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ एमएस रमैया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रात्रीच त्यांची प्राणज्योत मालवली.
कत्ती हे 1985 पासून कर्नाटक विधानसभेमध्ये 9 वेळा निवडून गेले आहेत. मंगळवारी रात्री बंगळुरु इथं कत्तींचं निधन झाल्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह पालकमंत्री गोविंद कारजोळ, महसूलमंत्री आर अशोक, लक्ष्मण सवदी यांनी अंतिम दर्शन घेतलं. कत्ती हुक्केरी मतदारसंघातून 9 वेळा निवडून आलेले ज्येष्ठ आमदार होते. 1983 मध्ये त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर, कत्तींनी लहान वयातच पोटनिवडणूक जिंकली आणि ते आमदार म्हणून निवडून आले होते. मंत्री उमेश कत्तींच्या निधनामुळं बेळगाव जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालयांना बुधवारी सुट्टी देण्यात आलीय. त्यांचं पार्थिव विशेष विमानानं बेळगाव विमानतळावर येणार असून बेळगावनंतर ते बेल्लद बागेवाडी येथील विश्वनाथ शुगर्स इथं अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर सायंकाळी 5 वाजता बेल्लद बागेवाडी इथं अंतिम संस्कार केले जाणार आहेत.