
no images were found
सरसेनापती संताजी घोरपडे स्मारक मार्चपर्यंत पूर्ण होईल-मुश्रीफ
कोल्हापूर : महान मराठा योद्धे सरसेनापती संताजी घोरपडे यांचे सेनापती कापशी ता. कागल येथील स्मारक मार्चअखेर पूर्ण होईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सरसेनापती संताजी घोरपडे शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले. अशा या महान योद्ध्याचे स्मारक पिढ्यान-पिढ्या प्रेरणादायी ठरेल, असेही ते म्हणाले.
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याने सेनापती कापशी ता. कागल येथे सुरु असलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. स्मारकामधील पुतळ्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांची कोल्हापुरातील त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.
डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, औरंगजेबाचा चरित्रकार खाफीखान यांनेही संताजींच्या शौर्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. एवढी त्यांची महानता होती.
या कामावर आतापर्यंत साडेचार कोटी रुपये खर्च झालेला आहे. सव्वाचार कोटी रुपयांचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. स्मारकासह परिसरातील सभागृह, ग्रंथालय, सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या अश्वारूढ पुतळ्यासह चबुतरा या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, महान मराठा योद्धे सरसेनापती संताजी घोरपडे यांचे एकही मूळ छायाचित्र किंवा त्यावर आधारित पुतळा उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांचा संपूर्ण इतिहास वाचून त्यांच्या चरित्रावरूनच त्यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि एकूणच पुतळा निर्माण होणार आहे. कोल्हापुरातील प्रसिद्ध शिल्पकार किशोर पुरेकर हा पुतळा घडविणार आहेत.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार, कार्यकारी अभियंता संजय पाटील, वास्तु विशारद अमरजा निंबाळकर, कागलचे उप अभियंता सी. ए. पाटील, सुनील चौगुले आदी उपस्थित होते.