
no images were found
रेशीम शेती हा अर्थव्यवस्थेला गती देणारा प्रकल्प – जिल्हाधिकारी
कोल्हापूर, : आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासह तरुण आणि प्रगतिशील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रेशीम शेतीविषयी माहिती घेतली पाहिजे. तसेच, सामाजिक माध्यमांचा वापर करून रेशीम शेतीचा अभ्यास व प्रसार केला पाहिजे. शेतकऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी बेले गावाने घेतलेला पुढाकार अनुकरणीय असून, जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनीही रेशीम शेतीसाठी प्रयत्न करावेत. सहकार क्षेत्रातून जशी प्रगती झाली, तशीच प्रगती रेशीम शेतीतही माहितीच्या देवाणघेवाणीतून साधता येईल, सध्या जिल्ह्यात ८०० एकरवर रेशीम शेती केली जात असून, येत्या वर्षभरात ही शेती ३ हजार एकरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
जिल्हाधिकारी श्री. येडगे यांच्या हस्ते बेले येथील शासकीय योजनेंतर्गत उभारलेल्या रेशीम चॉकी कीटक संगोपन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रामेतीचे प्राचार्य बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंधर पांगरे, तहसीलदार स्वप्नील रावडे, रेशीम अधिकारी बी.एम. खंडागळे, रेशीम कक्ष मंत्रालय मुंबई येथील प्रतिनिधी निशा देसाई, गटविकास अधिकारी संदीप भंडारे, बेले गावच्या सरपंच अर्चना लांबोरे, उपसरपंच बाजीराव लांबोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, ‘रेशीम शेती ही शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. एक एकर शेतीत किमान पाच चक्रे पूर्ण झाली, तरी तीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. चॉकी संगोपन केंद्रामार्फत शेतकऱ्यांना सुदृढ आळ्या उपलब्ध होणार आहेत. या केंद्रात ५ हजार अंडीपुंजांची क्षमता असून, जिल्ह्यातील गरज यातून पूर्ण होऊ शकेल. तरुण शेतकऱ्यांसाठी तानाजी पाटील हे आदर्श ठरले आहेत. कोल्हापूर जिल्हा नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ओळखला जातो. ऊस शेतीबरोबरच रेशीम शेती हाही उत्पन्नाचा शाश्वत पर्याय ठरतो आहे.’
प्राचार्य बसवराज मास्तोळी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ‘बेले हे रेशीम शेतीला प्रोत्साहन देणारे गाव आहे. ऊस शेती आणि दुग्धव्यवसायानंतर रेशीम शेती हा शाश्वत आणि फायदेशीर उत्पन्नाचा स्रोत ठरतो.’ यावेळी रेशीम कोष उत्पादक सुरेश पाटील, स्वयंचलित रेलींग यंत्र सुरू करणारे डॉ. अभिजीत घाटगे, तसेच रेशीम प्रकल्पाचे मालक तानाजी पाटील यांनी आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये जिल्हा रेशीम अधिकारी श्री. खंडागळे यांनी चॉकी कीटक संगोपन केंद्राची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अंडीपुंज उबवून प्रथम व द्वितीय टप्प्यातील बाल्यावस्थेतील आळ्या तयार केल्या जातात. या सुदृढ आळ्या शेतकऱ्यांना वितरित केल्या जातात, जेणेकरून त्यांना थेट कोष उत्पादनावर लक्ष केंद्रित करता येते. त्यामुळे अंडी उबवण्याच्या तांत्रिक अडचणी टाळता येतात आणि कोषांची गुणवत्ता व उत्पादनात वाढ होते. या योजनेअंतर्गत चॉकी संगोपन केंद्र स्थापन करण्यासाठी तानाजी पाटील यांना १३ लाख रुपयांचा खर्च आला असून, यातील ५०% केंद्रीय रेशीम मंडळ, २५% राज्य शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे. उर्वरित २५% हिस्सा लाभार्थीकडून घेतला जातो.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गावात प्रथमच जिल्हाधिकाऱ्यांचे आगमन झाल्याने ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. दीपप्रज्वलन व कोनशीला अनावरणानंतर पाहुण्यांनी चॉकी संगोपन प्रक्रियेची पाहणी केली. कार्यक्रमात रेशीम शेतीसाठी विशेष योगदान दिलेल्या शेतकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कृत शेतकऱ्यांमध्ये तेजस पाटील, सुरेश पाटील, रत्नाबाई पाटील, नंदकुमार पाटील, आश्विनी जरग, अभिजीत घाटगे, सुनील पाटील व चंद्रकांत पाटील यांचा समावेश होता.