
no images were found
एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत सिक्कीम राज्य स्थापना दिवस राजभवन येथे साजरा
कोल्हापूर, (प्रतिनिधी):- आज काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत देश प्लास्टिक कचऱ्याने विद्रुप होत आहे. सिक्कीम मात्र देशातील सर्वाधिक कमी प्रमाणात प्लास्टिकचा वापर करणारे ते राज्य ठरले आहे. ही गोष्ट महाराष्ट्रासह इतर सर्व राज्यांनी शिकण्यासारखी असून युवकांनी किमान आपला परिसर प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प केला तर देश पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम होईल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.
सिक्कीम राज्याचा ५० वा राज्य स्थापना वर्धापन दिवस राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राजभवन मुंबई शुक्रवारी (दि. १६ मे) साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत राजभवनातर्फे शिवाजी विद्यापीठाच्या सहकार्याने सिक्कीम राज्य स्थापना दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
साधारण तीन दशकांपूर्वी देशात कुणीही प्लास्टिक – पॉलिथिन बॅग वापरात नसत. प्लास्टिक न वापरल्यामुळे कुणाचेही फारसे काम अडत नव्हते. आज मात्र लोक खरेदीसाठी बाहेर जाताना कधीही कापडी पिशवी नेत नाही. प्रत्येक वस्तू प्लास्टिक मध्ये आणली जाते. साधा चहा देखील लोक पॉलिथिन बॅग मध्ये आणतात. अशा प्रकारच्या चहाचे आरोग्यावर काय परिणाम होतात याचा विचार देखील करीत नाहीत. या स्थितीचा विचार करून युवकांनी प्लास्टिकचा वापर कमी करावा व बाहेर पडताना नेहमी कापडी पिशवी सोबत बाळगावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
सिक्कीम व इतर उत्तरपूर्व राज्याचे सौंदर्य स्वित्झर्लंड पेक्षा तसूभर देखील कमी नाही. आपण स्वतः स्वित्झर्लंडला जाऊन आलो. त्या देशापेक्षा कितीतरी पटीने नैसर्गिक सौंदर्य भारतात आहे. मात्र उत्तम मार्केटिंग मुळे काही देश पर्यटनात पुढे गेले आहे असे सांगून लोकांनी सिक्कीमसह उत्तरपूर्व राज्ये तसेच जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश या राज्यांना भेट द्यावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
आज सिंगापूर व थायलंड जगातील सर्वाधिक पर्यटक आकर्षित करतात. मात्र, भारतात इतक्या नदया, गडकिल्ले, वारसा शिल्पे व निसर्ग संपदा आहे की जगातील अर्धे पर्यटक आपण आकर्षिक करू शकतो असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.
संपूर्ण देशातील लोकांमध्ये असलेल्या ऐक्याच्या भावनेमुळे पाकिस्तान ‘सिंदूर’ मोहिमेनंतर शांत झाला असे सांगून लोकांनी एकता टिकवून ठेवली तर भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल असे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सिक्कीमचे लोक नृत्य घोंटू व लोकगीत लेपचा तसेच सिक्कीमचे राज्यगीत उत्कृष्ट सादर केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली.
शिवाजी विद्यापीठाच्या कुलदीप जठार व श्रद्धा चराटकर या विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून सिक्कीम येथील तरुणीचे सुंदर चित्र साकारल्याबद्दल तसेच ओंकार गोमासे या विद्यार्थ्याने सिक्कीम येथील लोकजीवनाचे तैलचित्र काढल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
विद्यापीठाच्या वृत्तविद्या व जनसंवाद विभागातर्फे तयार करण्यात आलेला सिक्कीम राज्यावरील माहितीपट ‘सिक्कीम या पॅराडाईज ऑफ इंडिया’ यावेळी दाखविण्यात आला.
राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले तर अवर सचिव सुशील मोरे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ डी. टी शिर्के, प्रकुलगुरु पी एस पाटील, कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे, व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच विद्यापीठाच्या सांस्कृतिक चमूचे सदस्य उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कला सादरीकरण केल्याबददल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.