
no images were found
तिरंगा पदयात्रा उत्साहात संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी):-पहेलगाम येथे पर्यटकांवर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देत भारतीय सैन्य दलाने अवघ्या दोनच दिवसात पाकिस्तानला शरणागती पत्करायला लावली. भारतीय सैन्य दलाच्या या अतुलनीय पराक्रमाला सलाम करण्यासाठी देशभरात ठिकठिकाणी तिरंगा पदयात्रांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने आज शनिवार दिनांक 17 मे रोजी सकाळी आठ वाजता भारतीय जनता पार्टीच्या पुढाकारातून कोल्हापुरात भव्य तिरंगा पदयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
दसरा चौक येथे छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या पदयात्रेला सुरवात झाली. यावेळी कोल्हापुरातील राष्ट्रप्रेमी नागरिक, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, जिल्ह्यातील माजी सैनिक, महिला यांची मोठी उपस्थिती होती. भारत माता की जय, वंदे मातरम, भारतीय सैन्याचा विजय असो अशा घोषणांनी दसरा चौक दणाणून सोडला.
पदयात्रेच्या प्रारंभी भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय सैनिक यांच्या पोशाखातील चिमुकल्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. माजी सैनिकांच्या उपस्थितीने एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह निर्माण झाला होता. सर्वांनी तिरंगा ध्वज हाती घेत सैन्याबद्दल प्रोत्साहन पर घोषणा देत ही पदयात्रा आईसाहेब महाराज पुतळा- बिंदू चौक- शिवाजी रोड मार्गे छत्रपती शिवाजी चौकात विसर्जित करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी व त्यांचे अभिनंदन करण्यासाठी देशभरात भाजपा तिरंगा पदयात्रा मोठ्या उत्साहात काढत आहे. पहेलगाम हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्य पाकिस्तान मध्ये घुसून त्यांचे नऊ दहशतवादी अड्डे उध्वस्त केले 100 पेक्षा जास्त अतिरेक्यांना खात्मा करण्यात आला. देशाच्या सक्षम पंतप्रधानांनी या हल्ल्यानंतर सांगितले आहे येथून पुढे असे हल्ले झाल्यास त्याची पुनरावृत्ती आमच्याकडून युद्धाकडून होईल. दोन दिवसांमध्ये पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणाऱ्या भारतीय सैनिकांचे अभिनंदन करण्यासाठी या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते असे सांगितले त्याचबरोबर या पदयात्रेत उपस्थित राष्ट्रप्रेमी नागरिकांचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, महेश जाधव, शौमिका महाडिक, राहूल चिकोडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.