
no images were found
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्र अधिक कार्यक्षम बनेल- डॉ. संतोष भावे
कोल्हापूर (प्रतिनिधी):-कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (ए.आय.) मनुष्यबळ व्यवस्थापन (एच.आर.) क्षेत्र अधिक कार्यक्षम बनेल. एच. आर. ही फक्त एक प्रशासनिक प्रक्रिया न राहता, व्यवसायाच्या वृद्धीचाही महत्त्वाचा भाग बनेल, असा विश्वास भारत फोर्जचे माजी संचालक (एच.आर.) डॉ. संतोष भावे यांनी व्यक्त केला. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, येथे व्यवस्थापन विभागाच्यावतीने “मानव संसाधन व्यवस्थापन (HRM)” या विषयावरील कार्यशाळेत प्रामुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
डॉ. भावे यांनी, तंत्रज्ञान व डेटा-आधारित मानव संसाधन व्यवस्थापन, ए. आय. चा वापर, कर्मचारी गुंतवणूक व कल्याण, कौशल्य विकास, टॅलेंट मॅनेजमेंट, कामासाठी सकारात्मक वातावरण निर्मिती, इंडस्ट्रीयल रिलेशनच्या प्रभावी टिप्स, मूल्याधारित संस्था, आणि एच.आर. क्षेत्रातील करिअर संधी यावर सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी व्यवस्थापनातील सध्याचे ट्रेंड्स आणि सर्वोत्तम पद्धती यांची माहिती दिली. या कार्यशाळेत तीन सत्रांमधून एच. आर. क्षेत्रातील आधुनिक ट्रेंड ते औद्योगिक संबंधांपर्यंत विविध पैलूंवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेनंतर विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी कुलगुरु डॉ. राकेशकुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, महाविद्यालयाचे संचालक डॉ. अजित पाटील आणि व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. आसावरी कदम यांच्यासह व्यवस्थापन विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.