no images were found
जागतिक स्तरावर इस्त्राइलच्या पाठिशी उभे राहण्याची आवश्यकता – हिंदु जनजागृती समिती
नुकतेच पॅलेस्टाईन येथील ‘हमास’ या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांनी इस्त्राइलवर हजारो रॉकेटसह, जमिनीवरून, तसेच सागरी मार्गाने घुसून आक्रमण केले आणि शेकडो निष्पाप इस्रायली नागरिकांच्या हत्या केल्या. या आतंकवादी आक्रमणाचा हिंदु जनजागृती समिती तीव्र शब्दांत निषेध करते आणि जिहादी दहशतवादाच्या विरोधात जागतिक स्तरावर इस्राइलच्या पाठीशी उभे रहाण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी मांडली आहे. भारतातही ज्यू बांधव शांततेने रहात आहेत. हिंदु जनजागृती समिती ज्यू बांधवांच्या पाठिशी आहे, असेही श्री. शिंदे यांनी म्हटले आहे.
आज इस्राइलमध्ये आक्रमण झाले, यापूर्वी काश्मीरमध्येही अशी आतंकवादी आक्रमणे होत होती; उद्या अन्य कुठेही अशी आक्रमणे होऊ शकतात. जिहादी आतंकवाद ही आंतरराष्ट्रीय समस्या आहे. त्याचा जागतिक स्तरावर विरोध व्हायला हवा. या दृष्टीने पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी त्वरित इस्राइलवरील हल्ल्याचा निषेध करत त्यांच्या समर्थनाची अर्थात् जिहादी दहशतवादाच्या विरोधात भूमिका घेतली. भारत सरकारच्या या भूमिकेचेही हिंदु जनजागृती समिती समर्थन करते. दुर्दैवाने काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ भूमिका घेतल्याचे त्यांनी जाहीर केले. एकीकडे पॅलेस्टाइनची जमीन, स्वशासन आणि आत्मसन्मान अन् प्रतिष्ठा यांनी जीवन जगण्याचा अधिकारांचे समर्थन करण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने मांडली; मात्र याच पॅलेस्टाइनच्या भूमीवरून ‘हमास’ या आतंकवादी संघटनेने इस्राइलवर आक्रमण करत सहस्रो निष्पाप नागरिकांच्या हत्या केल्या, महिलांना पळवून नेत त्यांच्यावर अत्याचार केले. याबद्दल काँग्रेसने चकार शब्द काढलेला नाही. जर पॅलेस्टाइनला आत्मसन्मान आणि प्रतिष्ठा यांनी जगण्याचा अधिकार आहे, तर मग तो इस्राइली जनतेला नाही का ? इस्राइलवर आक्रमण झाल्यावर त्यांनी प्रतिकार न करता दुसरा गाल पुढे करत ‘गांधीगिरी’ करणे काँग्रेसला अपेक्षित आहे का ? काँग्रेसची ही भूमिका जिहादी दहशतवादाचे समर्थन करणारी आहे. त्यामुळे इस्राइलवरील हल्ल्याबद्दल जेवढा निषेध ‘हमास’चा करायला हवा, तेवढाच निषेध जिहादी दहशतवादाचे समर्थन करणार्या काँग्रेसचाही करायला हवा, असे समितीने म्हटले आहे.
याचप्रमाणे अलिगढ मुस्लिम विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांनीही इस्राइलच्या विरोधात मोर्चे काढले, ही बाब अतिशय गंभीर आहे. यातून अलिगढ मुस्लिम विद्यापिठाचे विद्यार्थी हे ‘हमास’ या आतंकवादी संघटनेचे उघडउघड समर्थन करत आहेत. या घटनेची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एन्.आय्.ए.च्या) माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशीही आम्ही मागणी करत आहोत, असे श्री. शिंदे यांनी या वेळी म्हटले आहे.