Home Video कर्करोगावर उपचारांपासून ते तणाव मापनापर्यंतचे प्रकल्प; ५४ स्टार्टअपसाठीही सादरीकरण

कर्करोगावर उपचारांपासून ते तणाव मापनापर्यंतचे प्रकल्प; ५४ स्टार्टअपसाठीही सादरीकरण

9 second read
0
0
41

no images were found

कर्करोगावर उपचारांपासून ते तणाव मापनापर्यंतचे प्रकल्प; ५४ स्टार्टअपसाठीही सादरीकरण

      कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात भरविण्यात आलेल्या दोनदिवसीय विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा महोत्सवामध्ये विद्यार्थी व संशोधकांमधील सृजनशीलतेबरोबरच सामाजिक जाणिवांचे प्रतिबिंब पडल्याचे दिसून आले. या महोत्सवाचे आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि रसायनशास्त्र अधिविभाग यांनी स्पर्धेचे संयोजन केले. शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक दृष्टीकोन निर्माण करण्याचे उद्दीष्ट बाळगून दरवर्षी आविष्कार संशोधन महोत्सव आयोजित करण्यात येतो. जिल्हास्तरीय महाविद्यालयीन स्पर्धेच्या फेऱ्यांनंतर आज विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा महोत्सव राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात पार पडला. 

सद्यस्थितीत मानवी समुदायाला भेडसावणाऱ्या व्यक्तीगत ते स्थानिक सामाजिक समस्यांवर संशोधनाच्या सहाय्याने पर्याय शोधण्याचा प्रयत्न विद्यार्थी करीत असल्याचे दिसून आले. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आज पदवीस्तरीय ५२ आणि संशोधनस्तरीय ५० अशा एकूण १०२ संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून संशोधनपर प्रकल्प, पोस्टर सादर केले. 

पदवी, पदव्युत्तर स्तरीय विद्यार्थी आणि संशोधक अशा तीन स्तरांमध्ये या स्पर्धा वर्गीकृत असून आज पदवीस्तरीय विद्यार्थी आणि संशोधक या दोन गटांतील स्पर्धा झाल्या. मानव्यशास्त्र, भाषा आणि कला, वाणिज्य, व्यवस्थापन आणि कायदा, विज्ञान, कृषी आणि पशुसंवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान तसेच वैद्यकीय आणि औषधनिर्माण या सहा श्रेणींमध्ये विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादरीकरण केले. त्या १२ मॉडेल्सचाही समावेश होता. विशेष म्हणजे यामधील ५४ प्रकल्पांचे सादरीकरण स्टार्टअपसाठी करण्यात आले.

महोत्सवात सादर करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये अनेक नवोन्मेषी संशोधन प्रकल्पांचा समावेश होता. त्यात नागरिक, शेतकरी यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठीचे प्रकल्प होते. तणकटापासून जैवप्लास्टीक निर्मिती, मोबाईलवरुन नियंत्रित करता येणारे कृषीरोबोट यंत्र, मोबाईलवरील फिशिंग हल्ला ओळखणारी मशीन लर्निंग यंत्रणा, सुरक्षित कृषीपंपासाठी आरएफआयडी आधारित शॉकरहित चालू-बंद यंत्रणा, शारीरिक तणाव मापन यंत्रणा, अतिसंवेदनशील वीजमापन यंत्र, मूत्रमार्ग संसर्गावर उपचारांसाठी चांदीच्या नॅनोपार्टिकल्सचे हरित संश्लेषण, जैववैद्यकीय उपकरणे, वनस्पतींपासून वेदनाशामक औषधनिर्मिती, फुप्फुसाच्या कर्करोगावर नाविन्यपूर्ण उपचार पद्धती, ड्रॅगन फ्रूटपासून आईस-क्रीम, स्मार्ट वॉटर कन्ट्रोल सिस्टीम, ग्लुटेन फ्री कुकीज, ऑनलाईन बसपास वितरणासाठीचे अॅप, अवजड ट्रेलर्ससाठी हायड्रॉलिक स्टॉपर, रेल्वे अपघातरोधक यंत्रणा, बिलींग यंत्रणासज्ज स्मार्ट शॉपिंग ट्रॉली यांसह भारतीय खाद्यसंस्कृती, द्राक्षशेती उत्पादनवृद्धी, महिला सबलीकरण कायदे, प्रवीण बांदेकर यांच्या साहित्यातील देशीवाद, विटा येथील यंत्रमागावरील वस्त्रोद्योग इत्यादी संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सर्वच प्रकल्पांमध्ये त्यांच्या सामाजिक जाणिवांचे प्रतिबिंब उमटले असून त्यातून समाजाच्या समस्या निराकरणाबरोबरच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांचे जीवन सुखकर आणि आरोग्यदायी बनविण्याची तळमळ दिसून येते, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. शिर्के यांनी यावेळी सर्व प्रकल्पांच्या पाहणीनंतर व्यक्त केली. संशोधक विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदनही केले.

यावेळी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, रसायनशास्त्र  अधिविभागाचे प्रमुख डॉ. कैलास सोनावणे, समन्वयक डॉ. डी.एच. दगडे, डॉ. डी.एम. पोरे, डॉ. डी.एस. भांगे, डॉ. एस.एन. तायडे, डॉ. के.एम. गरडकर, डॉ. एस.एस. कोळेकर, डॉ. पी.व्ही. अनभुले, डॉ. जी.एस. राशिनकर, डॉ. एस.ए. संकपाळ, डॉ. राहुल माने, डॉ. सोमनाथ पवार यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध अधिविभागांतील तसेच महाविद्यालयीन शिक्षकांनी परीक्षक म्हणून काम पाहिले

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

तळातील समाजघटकांना परवडणारे तंत्रज्ञान अभियंत्यांनी विकसित करावे.- डाॅ. प्रतापसिंह देसाई.

  तळातील समाजघटकांना परवडणारे तंत्रज्ञान अभियंत्यांनी विकसित करावे.- डाॅ. प्रतापसिंह …