
no images were found
डी. वाय. पाटील विद्यापीठाला पाणी विघटन पद्धतीसाठी पेटंट
कोल्हापूर (प्रतिनिधी ): ‘कोबाल्ट आयर्न फॉस्फेट’च्या पातळ फिती वापरुन पाणी विघटन करण्याच्या सुलभ पद्धतीला डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला पेटंट जाहीर झाले आहे. विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी हे महत्वपूर्ण संशोधन केले असून विद्यापीठाला मिळालेले हे २७ वे पेटंट आहे.
पाणी विघटनासाठी यापूर्वी अनेक संशोधकांनी कोबाल्ट आयर्न फॉस्फेटची पावडर वापरली आहे. मात्र, विद्यापीठच्या संशोधकानी त्यापेक्षा पातळ फितीचा उपयोग करून पाण्याचे विघटन करून उत्कृष्ट परिणाम मिळवले आहेत. या पातळ फितीमुळे पाणी विघटन प्रणालीची कार्यक्षमता, स्थिरता आणि किफायतशीरपणा सुधारण्यास मदत होते. तसेच यातून मिळालेल्या हायड्रोजन वायूचा वापर स्वच्छ इंधन म्हणून केला जाऊ शकतो. या शोधाअंतर्गत प्रमाणित केलेली नाविन्यपूर्ण पाणी विघटनाची पद्धत पुढील २० वर्षासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या नावे पेटंट स्वरूपात संरक्षित केला जाईल.
मुख्य संशोधक डॉ. उमाकांत पाटील यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, वाढत चाललेले प्रदूषण व संपत चाललेले कच्च्या तेलाचे साठे या संकटावर मात करण्यासाठी ऑक्सीजन व हायड्रोजन निर्मितीसाठी लागणारे कमीखर्चीक पदार्थ व पद्धती यावर अधिक संशोधन करणे गरजेचे आहे. या संशोधनामध्ये मुख्य संशोधक प्रा. सी. डी. लोखंडे व डॉ. उमाकांत महादेव पाटील यांच्यासमवेत संशोधक विद्यार्थी डॉ. सुरज खलाटे आणि डॉ. सचिन पुजारी यांचा सहभाग होता.
पेटंट मिळवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व संशोधकांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.