
no images were found
स्पर्धा परिक्षेसाठी जिल्हा प्रशासनामार्फत दर महिन्याच्या पाच तारखेला व्याख्यान
कोल्हापूर : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तसेच या परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढावा म्हणून जिल्हा प्रशासन मार्गदर्शन करीत आहे. स्पर्धा परीक्षा तयारी, त्याबाबत आवश्यक माहिती दर महिन्याच्या पाच तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात सायंकाळी 5 ते 7 या वेळेत हे व्याख्यान होणार आहे. दिनांक 05 ऑक्टोबर, रोजी सायं. 5 वाजता पोलीस उपअधिक्षक रविंद्र भोसले हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थी व परीक्षार्थ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे आव्हानेही वाढत आहेत. बदलत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी विद्यार्थी अपार कष्ट घेत आहेत. या विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धा परिक्षा, त्याचे महत्व हे लहान वयातच समजावे, त्यातून महाविद्यालयीन विद्यार्थीही या क्षेत्राकडे वळावे, याकरिता स्पर्धा परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शनाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
जिल्ह्यात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांचे शंभराहून अधिक अधिकारी आहेत. हे अधिकारी विद्यार्थ्याना प्रत्येक विभागातील संधी, त्यासाठी होणाऱ्या परीक्षा, त्यासाठी असणारी पात्रता, करावी लागणारी तयारी आदीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. अनुभवाद्वारे स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, कोणत्या पद्धतीने अभ्यास करावा, अभ्यासाचे नियोजन कसे असावे. प्राथमिक तयारी करणाऱ्यांनी नेमकी सुरुवात कशापासून करावी आदी विविध पातळीवर मार्गदर्शन करणार आहेत. दर महिन्यात विविध अधिकारी या उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना माहिती देणार आहेत. या उपक्रमाचा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा फायदा होणार आहे.