no images were found
लाच मागितली म्हणून सरपंचाने उधळले दोन लाख रुपये
संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विहिरीच्या कामासाठी लाच मागितली म्हणून संतापलेल्या सरपंचाने अनोखे आंदोलन केले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील मंगेश साबळे असं या सरपंचाचं नाव आहे. मंगेश साबळे यांनी फुलंब्री पंचायत समितीच्या कार्यालयासमोर ही पैशांची उधळण केली आहे. शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्याकडून लाच मागितली जात असल्याचा आरोप मंगेश साबळे यांनी केला होता. त्यानंतर फुलंब्री पंचायत समितीच्या कार्यालयासमोर त्यांनी दोन लाख रूपयांच्या नोटांची उधळण करत आंदोलन केलं आहे.
याबाबत बोलतांना साबळे म्हणाले की, गेवराई पायगा गावात विहिरीचे 20 प्रस्ताव दाखल झाले असून या कामाला मंजुरी देण्यासाठी गटविकास अधिकारी 12 टक्के रक्कम मागत आहेत. कनिष्ठ अभियंता गायकवाड, ग्रामरोजगार सेविकासोबत गटविकास अधिकारी यांची भेट घेतली. यावेळी आणलेले 1 लाख रुपये न घेता मला कार्यालयाबाहेर पाठविले. त्यानंतर कनिष्ठ अभियंता आणि रोजगार सेवकाला पाठवून 12 टक्के प्रमाणे रक्कम देण्यास सांगितले. यामुळे आज 2 लाख रुपये घेऊन मी कार्यालयात आलो. पण त्यांनी पैसे घेतले नाहीत, अशी माहिती मंगेश साबळे यांनी दिली