no images were found
मुंबई महापालिका भाजपा आणि शिंदे गट एकत्र लढणार – अमित शाह
मुंबई– महापालिका निवडणुकातील भाजपा आणि एकनाथ शिंदे गट यांची शिवसेना एकत्र लढणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. गणरायाच्या दर्शनासाठी मुंबईच्या दौऱ्यावर आलेल्या अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेघदूत बंगल्यावर भाजपाच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेत १५० नगरसेवकांचे टार्गेट भाजपाला दिले आहे. यावेळी त्यांनी मुंबईत भाजपाचेच वर्चस्व राहाय़ला हवे, असा सल्लाच सर्व भाजपा नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिला आहे. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला धोका दिल्याचे सांगत, त्यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. राजकारणात धोका सहन करु नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. शिवसेनेनं भाजपाच्या जागा पाडल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अशा प्रकारे जागा पाडून शिवसेनेने भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका त्यांनी केली आहे. स्वत:च्या चुकीमुळेच शिवसेना फुटली अशी टीकाही त्यांनी केली आहे.
२०१४ साली केवळ दोन जागांसाठी शिवसेनेने युती तोडली असा आरोपही अमित शाह यांनी केला आहे. स्वताच्या निर्णयामुळे शिवसेना छोटा पक्ष झाल्याची टीका त्यांनी केली आहे. अमित शाहा हे मुंबईच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सकाळी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे आशिष शेलार यांच्या वांद्र्याच्या गणेश मंडळालाही त्यांनी भेट दिली. त्यानंतर मेघदूत बंगल्यावर त्यांनी भाजपाच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.