no images were found
जिल्ह्यात राज्य शासनाच्यावतीने ही विशेष मोहिम राबविण्यात येणार – जिल्हाधिकारी राहुल रेखावार
कोल्हापूर :– सर्वसामान्य जनतेची कामे विहित कालावधीत पूर्ण व्हावीत व नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्यासाठी १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२३ दरम्यान सेवा महिना राबविण्यात येणार आहे. राज्य शासनाकडून विहित विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना व सेवा यांची माहिती नागरिकांना प्राप्त व्हावी, त्याचा योग्य लाभ नागरिकांना घेता यावा तसेच शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा या हेतूने राज्य शासनाच्यावतीने ही विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे.
सेवा महिन्यामध्ये प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेशी निगडीत असणाऱ्या महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, महानगरपालिका, नगर पालिका, कृषी विभाग, आदिवासी विकास विभाग, आरोग्य विभाग, ऊर्जा विभाग व अन्य विभागाकडील सेवा विषयी प्रलंबित कामांचा निपटारा करावयाचा आहे. यासाठी संबंधित खात्यांच्या प्रमुखांनी नियोजन करुन प्रलंबित कामांची अंमलबजावणी क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडून दैनंदिन आढावा व क्षेत्रिय भेटी देऊन करणे अपेक्षित आहे.
विशेष मोहिमेमध्ये गरजू नागरिकांना मार्गदर्शन व त्यांच्या शंकांचे निरसन करुन त्यांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी शासनाच्या प्रत्येक कार्यालयामध्ये हेल्प डेस्क किंवा हेल्पलाईन कक्ष स्थापन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
या विशेष मोहिमेमध्ये विविध विभागांच्या एकूण २५ प्रमुख सेवांचा व अन्य ऑनलाईन सेवांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमध्ये तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी देणे, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतंर्गत सिंचन विहिरी करिता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित व वन हक्क पट्टे मंजूर करणे (अपिल वगळून), दिव्यांग प्रमाणपत्र देणे, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, आधार कार्ड सुविधा, पॅन कार्ड सुविधा, नवीन मतदार नोंदणी, जन्म मृत्यू नोंद घेणे व प्रमाणपत्र देणे, शिकाऊ चालक परवाना, रोजगार मेळावा, सखी किट वाटप, महिला बचत गटास परवानगी देणे, महिला बचत गटास प्राधान्याने रोजगार उपलब्ध करुन देणे, लसीकरण, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देणे या सेवा समाविष्ट केल्या आहेत. दि. १५ सप्टेंबर अखेर प्रलंबित असलेल्या अर्ज, सेवांवर या कालावधीत काम होणार आहे. सेवा महिना समाप्तीनंतर सर्व विभागाकडून निपटारा झालेल्या विषयीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.
ही विशेष मोहिम यशस्वीपणे राबवण्यासाठी सर्व जिल्हास्तरीय व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये अचूक नियोजन व स्थानिक प्रचार, प्रसिध्दी करुन नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग नोंदवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले आहे.