no images were found
शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे महापालिकेच्यावतीने उत्स्फुर्त स्वागत
कोल्हापूर : शाळेच्या पहिल्या दिवशी इ.१ ली च्या मुलांचे आज महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने शाळेमध्ये प्रवेशोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली होती. शाळेमध्ये सकाळी मुलांना पुष्पगुच्छ देऊन पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेचे वातावरण अगदी उत्साही व आनंददायी होते. कांही शाळेमध्ये तर स्वागत कमानी ‘ रंगीबेरंगी फुग्याची आरास करण्यात आली होती.
या प्रवेशोत्सवासाठी महानगरपालिकेकडील सर्व वरिष्ठ अधिकार्यांना शाळा वाटून देण्यात आल्या होत्या. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर व प्रशासनाधिकारी शंकर यादव यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकार्यांनी शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी महापालिकेच्या भाऊसो महागावकर विद्यालय, सहा. आयुक्त डॉ. विजय पाटील यांनी राजश्री शाहू विद्यालय बावडा, प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी नेहरूनगर विद्यालय, कार्यकम अधिकारी रसूल पाटील यांनी टेंबलाईवाडी विद्यालय येथे विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाच्या ठिकाणी माजी उपमहापौर सुलोचना नायकवडी, सामाजिक कार्यकर्ते दिनानाथ कदम, शांताराम सुतार उपस्थित होते. तर शिरीष शिंदे यांनी महाराणी ताराबाई विद्यालय, शैक्षणिक पर्यवेक्षक उषा सरदेसाई यांनी विजयादेवी घाटगे विद्यालय, विजय माळी यांनी ग. गो. जाधव विद्यालय, बाळासाहेब कांबळे यांनी महात्मा फुले विद्यालय या शाळांना भेटी देऊन मुलांना मार्गदर्शन केले. महापालिकेच्यावतीने आज शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.