Home शैक्षणिक जोमदार पीकवृद्धीसाठी टाकाऊ चहापत्तीपासून सेंद्रिय नॅनो संयुग निर्मिती

जोमदार पीकवृद्धीसाठी टाकाऊ चहापत्तीपासून सेंद्रिय नॅनो संयुग निर्मिती

3 min read
0
0
29

no images were found

जोमदार पीकवृद्धीसाठी टाकाऊ चहापत्तीपासून सेंद्रिय नॅनो संयुग निर्मिती

कोल्हापूर : स्वयंपाकघरात चहा शिजवल्यानंतर टाकून देण्यात येणाऱ्या चहापत्तीपासून कार्बन डॉट्स नॅनो संयुग तयार करण्याची प्रक्रिया शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्रज्ञांनी यशस्वी करून दाखविली असून या संशोधनाला नुकतेच भारतीय पेटंट प्रदान करण्यात आले. सदर द्रावण पूर्णतः सेंद्रिय स्वरुपाचे असून पीकवृद्धीसाठी अत्यंत परिणामकारक सिद्ध झाले आहे. विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. जी.बी. तथा गोविंद कोळेकर आणि डॉ. रविंद्र वाघमारे यांनी हे संशोधन केले आहे.  

स्वयंपाकघरात चहा बनवल्यानंतर शिल्लक चहापत्ती टाकून देण्यात येते. विद्यापीठाच्या रसायनशास्त्रज्ञांनी या टाकाऊ चहापत्तीपासून  कार्बन डॉट्स नॅनो मटेरिअल तयार केले. सदर संशोधन पर्यावरणपूरक, कमी खर्चिक तसेच शाश्वत शेतीस उपयुक्त ठरणारे आहे. या संशोधनामुळे पिके जोमाने फोफावतात, मुळेही जोर धरतात. तसेच बियाणांची उगवण क्षमताही वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुरवातीला या नॅनो मटेरिअलचा मेथींच्या बियांवर प्रयोग करण्यात आला. प्रयोगात मेथींच्या बियांनी अधिक पाणी शोषूण घेतले, तसेच या बियांची उगवणक्षमता वाढल्याचे लक्षात आले. एवढेच नव्हे, तर या मटेरिअलच्या वापरानंतर मेथीच्या रोपट्यांची मुळेही अधिक जोमाने वाढल्याचे दिसून आले. मुळांबरोबरच मेथीचे रोपटेही तितक्याच जोमाने वाढत असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले.
संशोधकांनी तयार केलेले कार्बन डॉट्स नॅनो मटेरिअल सोल्यूशन पूर्णतः सेंद्रिय असल्याने सर्व प्रकारच्या पिकांसाठी त्याचा वापर करता येऊ शकतो. यामध्ये पाणी धारण करण्याची क्षमता जास्त असल्याने जिरायती शेतीसाठी ते अधिक उपयुक्त ठरू शकते. सध्या चहापत्तीपासून तयार केलेले कार्बन डॉट्स नॅनो मटेरिअल द्रव स्वरूपात आहे. त्यामुळे याची पिकांवर फवारणी केल्यास पिकांची वाढ अधिक गतीने होण्यास मदत होते. सर्व प्रकारच्या पालेभाज्या तसेच फळभाज्यांवरही याची फवारणी करणे सहजशक्य आहे. सदर संशोधनाच्या चाचण्या प्रयोगशाळेबरोबरच प्रत्यक्ष शेतामध्येही घेण्यात आल्या आहेत. यासाठी डॉ. कोळेकर यांना विद्यापीठातील डॉ. प्रशांत अनभुले, डॉ. मानसिंगराज निंबाळकर, डॉ. अनिल गोरे, डॉ. वैभव नाईक, डॉ. दत्ता गुंजाळ यांचे सहकार्य लाभले.
रासायनिक खतांची मात्रा घटवणे शक्य

पिकांची वाढ जोमात व्हावी म्हणून शेतकरी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. या खतांचे पिकांसह जमिनीच्या पोतावर व मानवी आरोग्यवरही दुष्परिणाम होतात. शेतकऱ्यांनी चहापत्तीपासून बनविलेल्या कार्बन डॉट्स नॅनो मटेरिअल संयुगाचा वापर केल्यास रासायनिक खतांची मात्रा कमी करणे शक्य होणार आहे. खऱ्या अर्थाने हे द्रावण सेंद्रिय शेतीस पूरक ठरणारे आहे, असे डॉ. गोविंद कोळेकर यांनी सांगितले.

आरोग्यावरील दुष्परिणाम कमी करण्यास मदत

रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. रसायनयुक्त फळे आणि भाजीपाल्याचे सेवन केल्याने कर्करोगासह अनेक दुर्धर आजार होतात. यावर उपाय म्हणून रासायनिक खतांची मात्रा कमी करून सेंद्रीय शेतीवर भर द्यावा. यासाठी चहापत्तीपासून तयार केलेल्या कार्बन डॉट्स नॅनो मटेरिअलचा वापर केल्यास पिकांची गुणवत्ता चांगली राहून नागरिकांच्या आरोग्यावरील संभाव्य दुष्परिणाम कमी करण्यास मदत होईल, असेही डॉ. कोळेकर यांनी सांगितले.

समाजोपयोगी संशोधनकुलगुरू डॉ. शिर्के

शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्रज्ञांनी अलीकडील काळात सातत्याने समाजोपयोगी संशोधने करून त्यासाठी विविध पेटंटही प्राप्त केले आहेत, ही अत्यंत अभिनंदनीय बाब आहे. सेंद्रिय नॅनो संयुगही जोमदार पीकवाढीसाठी शेतकऱ्यांना वरदायी ठरेल. विद्यापीठातील अधिविभागांसह महाविद्यालयांमधून संशोधन करणाऱ्या संशोधकांनी आपल्या नजरेसमोर ही सामाजिक दायित्वाची भावना ठेवून संशोधनकार्य करावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …